लॉकडाऊनमुळे काम ठप्प झालं, नैराश्यग्रस्त अभिनेत्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
death

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका पडला आहे. या क्षेत्रांमध्ये मनोरंजनाचं क्षेत्रही समाविष्ट आहे. ही आर्थिक झळ सहन न झाल्याने एका अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मनमीत ग्रेवाल असं या तरुण अभिनेत्याचं नाव आहे. 29 वर्षांचा मनमीत गेल्या आठ वर्षांपासून मुंबईत राहत होता. छोट्या पडद्यावरील कुलदीपक नावाच्या एका मालिकेत तो झळकला होता. मात्र, त्यानंतर त्याला मनासारखं काम मिळालं नव्हतं. त्यात लॉकडाऊन झाल्याने हातात आलेलं कामही बंद पडलं होतं. मनमीतने वैयक्तिक कामासाठी आणि कुटुंबासाठी कर्जही काढलं होतं. पण, त्यानंतर काम न मिळाल्याने तो नैराश्यग्रस्त झाला होता.

manmeet-grewal

काही दिवसांपूर्वी त्याला एका वेबसीरीजची ऑफर आली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याचं चित्रीकरणही ठप्प आहे. त्यामुळे निराश झालेल्या मनमीतने शनिवारी रात्री पत्नीच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. मनमीत विवाहित होता. त्याने गळफास लावल्याचं लक्षात आल्यावर त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांकडे मदतही मागितली. मात्र, कोरोनाच्या भीतीने तिला कुणीही मदत केली नाही. अखेर इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने तिने मनमीतचा देह खाली उतरवला आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.