ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते-निर्माते अंबर कोठारे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, मुलगा आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

अंबर कोठारे म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्त्व. नोकरी सांभाळत त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घकाळ काम केले. आयएनटी या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धूमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते.