महाभारतातील ‘इंद्र’देव काळाच्या पडद्याआड, कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास

‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेमध्ये स्वर्गाधिपती इंद्र देवाची भूमिका साकारलेला दिग्गज कलाकार सतीश कौल (Satish Kaul) यांचे निधन झाले आहे. आज 10 एप्रिलला सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते.

सतीश कौल हे दीर्घ काळापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचाही लागण झाली होती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र उपचारादरम्यान लुधियाने याथे त्यांचे निधन झाले.

टीव्ही मालिका आणि अनेक पंजाबी, तसेच हिंदी चित्रपटामध्ये सतीश कौल यांनी काम केले होते. शाहरूख खान, अमिताभ बच्चन, देव आनंद, दिलीप कुमार यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह ते मोठ्या पडद्यावर दिसले होते. जवळपास 300 चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

सतीश कौल यांनी भूमिका केलेले काही चित्रपट

प्यार तो होना ही था (1998), आंटी नं 1 (1998), जंजीर (1998), याराना (1995), ऐलान (1994), इल्जाम (1986), शिवा का इंसाफ (1985) आणि कसम या हिंदी आणि आजादी, शेरा दे पुत्त शेर, मौला जट्ट, गुड्डो, पटोला और पींगा प्यार दीयां यासारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मान

पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये सतीश कौल यांचा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानही करण्यात आला होता. त्यांची ‘महाभारत’ मालिकेतील इंद्रदेवाची भूमिका विशेष गाजली होती. मात्र गेल्या काही काळापासून ते आर्थिक संकटामध्ये होते.

आपली प्रतिक्रिया द्या