
आपल्या मधुर आवाज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका सुलक्षणा पंडित (71) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलक्षणा यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे भाऊ, प्रसिद्ध संगीतकार ललित पंडित यांनी दिली.
सुलक्षणा पंडित यांचा जन्म संगीत घराण्यात झाला. महान शास्त्राrय गायक पंडित जसराज हे त्यांचे काका होते. सुलक्षणा यांचे बंधू जतीन-ललित प्रसिद्ध संगीतकार आहेत. सुलक्षणा यांनी वयाच्या नवव्या वर्षांपासून संगीताची साधना करण्यास सुरुवात केली. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संकल्प’ चित्रपटातील ‘तू ही सागर है तू ही किनारा’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला. त्यांनी संजीव कुमार यांच्यासोबत ‘उलझन’ आणि ‘संकोच’ या चित्रपटांमध्ये काम केले. संजीव कुमार यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते, मात्र त्यांची प्रेमकहाणी अधुरीच राहिली.




























































