बॉलीवूड अभिनेत्रीच्या माजी महिला मॅनेजरला गांजा तस्करी प्रकरणात अटक, एनसीबीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथे एका कुरीयरने आलेला गांजाचा साठा जप्त केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने खारमध्ये राहणाऱया एका ब्रिटिश नागरिकाच्या घरातून आणखी गांजाचा साठा जप्त केला. त्या ब्रिटिश नागरिकाच्या चौकशीत राहिला आणि शाईस्ता फर्निचरवाला या दोघा बहिणींची नावे समोर येताच त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडूनही गांजा जप्त करण्यात आला.

राहिला ही एका बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्वी मॅनेजर होती असे समजते. काही दिवसांपूर्वी एनसीबीने मिळालेल्या माहितीच्या आधारे वांद्रे पश्चिमेला एका कुरियरमधून आलेला गांजा जप्त केला होता. त्या गुह्याच्या तपासात खार पश्चिमेला जसवंत हाईटस या इमारतीत राहणारा ब्रिटिश नागरिक करण सजनानी यांने गांजा घरात ठेवला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने सजनानीच्या घरी छापा टाकला तेव्हा त्याने साठा करून ठेवलेला गांजा सापडला.

सजनानीने राहिला फर्निचरवाला हिच्याकडून गांजा घेतल्याचे चौकशीत समजताच एनसीबीने राहिला आणि तिची बहीण शाईस्ता हिला पकडले. शाईस्ताकडेही गांजा मिळून आला. या दोघींपैकी एक अभिनेत्री दिया मिर्झा हिची पूर्वी मॅनेजर असल्याचे समजते.