
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. केतकीची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर तिला घेऊन पोलीस ठाणे कारागृहात पोहोचले असून पुढील 14 दिवस केतकीचा या कारागृहात मुक्काम असणार आहे.
केतकी चितळे हिला शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी कळंबोलीतून अटक करून ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यानंतर तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत आज संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली. तसेच तिच्याविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून मुंबई पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे.


























































