
अनेक मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका वठवल्यानंतर अभिनेत्री मीरा जोशी आता वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर नुकत्याच दाखल झालेल्या ‘नवरी अशी हव्वी’ या मालिकेत ती दिव्यांग तरुणीची भूमिका साकारतेय. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत आपल्याला नवनवीन भूमिकांचे आव्हान स्वीकारायला आवडते, असे मीराने सांगितले.
‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत विकास पाटील आणि गौरी देशपांडे यांची मुख्य भूमिका आहे. यात मीरा जोशीदेखील अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. भूमिकेबाबत मीरा म्हणाली, ‘‘या मालिकेत मी एका पायाने अधू असलेल्या राखी या तरुणीची भूमिका साकारतेय. ती खूप स्वच्छंदी आणि पॉझिटिव्ह आहे. राखीचे नायकावर खूप प्रेम आहे. मात्र काही कारणात्सव त्यांचे लग्न होत नाही. पुढे काय होते ते मालिकेत पाहायला मिळेल. पुढे ती म्हणाली, ‘‘मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. एक पूर्ण-अपूर्ण हे पुस्तक मी वाचलं होतं. त्यातून दिव्यांगांच्या अडचणी, त्यांना करावा लागणारा संघर्ष मला बऱ्यापैकी समजला होता. पण भविष्यात आपल्यालाही दिव्यांगाची भूमिका साकारायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. राखीची भूमिका चॅलेंजिंग असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,’’ असा विश्वास तिने व्यक्त केला. आगामी काळात ती समीत कक्कड दिग्दर्शित ‘इंदौरी इश्क’ आणि समीर वंजारी दिग्दर्शित ‘ऑरेंज लिली’ या वेबसिरीजमध्येही झळकणार आहे.
नृत्य पहिलं प्रेम
अभिनयाव्यतिरिक्त उत्तम नृत्यांगणा अशी मीराची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगनाथ मंदिरात तिने नृत्य आराधना केली होती. नृत्य जास्त प्रिय आहे की अभिनय, याबाबत ती म्हणाली, ‘‘खरंतर नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे. त्यासाठीच मी मुंबईला आले होते. अभिनयाचा मी कधी विचारही केला नव्हता. पण आता अभिनय आणि नृत्य या दोन्ही गोष्टी मी एंजॉय करतेय.’’























































