
‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अवघ्या 10 दिवसांत अदानी उद्योगसमूहाला जबरदस्त हादरा बसला आहे. शेअर्सची वाताहत सुरूच असून, आतापर्यंत 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. हा आकडा अदानी समूहाच्या एकूण संपत्तिमूल्याच्या 50 टक्के आहे.
अमेरिकेच्या ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा अहवाल 24 जानेवारी रोजी जाहीर झाला आणि अदानी उद्योगसमूहातील समभाग कोसळण्यास सुरुवात झाली. अदानी समूहाच्या 10 कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजार उघडताच ‘अदानी एंटरप्रायजेस’चे शेअर्स 1017 रुपयांपर्यंत घसरले. तसेच अदानी पोर्टलचे शेअर्स 394 रुपयांपर्यंत कोसळले. एक वर्षातील ही नीचांकी घसरण होती. मात्र, बाजार बंद होताना ‘अदानी एंटरप्रायजेस’चा शेअर 1661 रुपये, तर ‘अदानी पोर्ट्स’चा शेअर 493 रुपयांपर्यंत सावरला. परंतु ‘अदानी ट्रान्समिशन’च्या शेअर्सची 10 टक्क्यांनी पडझड झाली. अदानी ग्रीन एनर्जी 10 टक्के, अदानी पॉवर 5 टक्के, अदानी टोटल गॅस 5 टक्के, अदानी विलमार 4.99 टक्के आणि ‘एनडीटीव्ही’चे शेअर्स 4.98 टक्क्यांनी कोसळले. या पडझडीमुळे आतापर्यंत अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. हा आकडा अदानी समूहाच्या एकूण संपत्तिमूल्याच्या सुमारे 50 टक्के इतका आहे.
अमेरिकन बाजारातून कंपनी ‘डी लिस्ट’
अमेरिकन भांडवली बाजारातील ‘डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स’मधून अदानी एंटरप्रायजेस ही कंपनी ‘डी लिस्ट’ करण्यात आली आहे. डाऊ जोन्स इंडेक्समध्ये जगभरातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालामुळे अदानी समूहाला हादरा बसला आहे.
देशाची आर्थिक स्थिती चांगली एलआयसी, स्टेट बँक फायद्यात – अर्थमंत्री
‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालानंतर अदानी उद्योगसमूहाला हादरे बसत आहेत. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदा भाष्य केले. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. एलआयसी आणि एसबीआय फायद्यात आहेत, असे त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘अदानी उद्योगसमूहासंबंधी सुरू असलेल्या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. विमा कंपनी एलआयसी आणि एसबीआय यांच्या प्रमुखांनी अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एलआयसी आणि एसबीआयची अदानी समूहात गुंतवणूक मर्यादित आहे. एसबीआय आणि एलआयसी फायद्यात असून, हे मी जबाबदारीने सांगते आहे,’’ असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.



























































