कामगार संघर्ष समितीच्या दणक्यानंतर अदानी इलेक्ट्रीसिटी व्यवस्थापन ताळ्यावर

रखडलेला करारनामा, बोनस अशा प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संघर्ष समितीने केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर अदानी इलेक्ट्रीसिटी व्यवस्थापन ताळ्यावर आले असून कामगारांच्या मागण्यांवर यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे.

अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड कंपनीमध्ये गेली 39 महिने करारनामा प्रलंबित आहे. आर्थिक वर्षात प्रचंड प्रमाणात नफा होऊनसुद्धा व्यवस्थापन दिवाळी बोनस देण्यास टाळाटाळ करीत होते तसेच मागील वर्षापेक्षा 20 टक्क्यांनी कमी बोनस देण्यात येईल व त्यात कोणताच बदल करण्यात येणार नाही, अशी ताठर भूमिका व्यवस्थापनाने घेतली. त्यानंतर कामगार संघर्ष समितीने कालपासून धरणे आंदोलन सुरू केले होते.

अखेर आज दुपारी व्यवस्थापनाच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढण्यात समितीला यश आले आहे. स्थानीय लोकाधिकार समिती व अदानी युनियनचे सरचिटणीस संघर्ष समितीचे प्रमुख व वर्कर्स कमिटीचे सर्वेसर्वा मंगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाबरोबर हा यशस्वी करार करण्यात आला.

बोनस, रखडलेली पगारवाढ मिळणार

आस्थापनातील कायमस्वरूपी कामगारांना कमीत कमी 50 हजार रुपये तर जास्तीत जास्त 70 हजार रुपये बोनस तसेच कंत्राटी कामगारांना बोनस आणि 21 दिवसांचा पगार म्हणजेच एकूण 41 हजारांची वाढ करून घेण्यास संघर्ष समिती यशस्वी झाली असून रखडलेली पगारवाढ देण्यासही व्यवस्थापन तयार झाले आहे.