वीज कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत अदानी इलेक्ट्रीसिटीविरोधात बेमुदत संप करायचा की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी उपनगरातील सहा ठिकाणी स्थायी आणि कंत्राटी वीज कामगारांचे मतदान घेण्यात येणार आहे. मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्यावतीने हे मतदान घेण्यात येणार आहे. कामगारांनी आंदोलन करण्याच्या बाजूने मतदान केल्यास 14 सप्टेंबर रोजी बेमुदत संप करण्याबाबतची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीमधील वीज कामगारांच्या वेतन वाढीबरोबरच विविध सोयी-सवलतीबाबत अदानी इलेक्ट्रिसिटी व्यवस्थापन आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये समझोता करार झाला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांनी आंदोलन करताच रिक्त पदे भरण्याबरोबरच कराराची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन व्यवस्थापनाने 2019 मध्ये दिले आहे. मात्र अद्याप त्याचे पालन होत नाही.
- कोरोना संकटात काम करणाऱ्य़ा कामगारांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याबाबत कंपनी तयार नाही.
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्य़ा कामगारांना त्याचा मोबादला नाही, प्रवासाचा खर्च मिळत नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संताप आहे.
- अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात बेमुदत संप करायचा का याबाबत कामगारांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्यावतीने 12सप्टेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.






























































