
होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाडय़ा धावणार आहेत. शिमगोत्सव काळातील गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून (एलटीटी) सावंतवाडीसाठी ज्यादा गाडय़ा सुटणार आहेत.
ट्रेन क्र. 01171 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड विशेष (साप्ताहिक) गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी सीएसएमटीहून रात्री 12.20 वाजता सुटेल. तर ट्रेन क्र. 01172 सावंतवाडी रोड-सीएसएमटी विशेष गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी सावंतवाडी रोडवरून सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
तसेच ट्रेन क्र. 01119 ही गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी रात्री 10.15 वाजता एलटीटीहून सुटेल. तर ट्रेन क्र. 01120 ही गाडी 27 फेब्रुवारी व 6 मार्च रोजी सायंकाळी 5.20 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबा असेल.
उद्यापासून आरक्षण खुले
ट्रेन क्र. 01172 आणि ट्रेन क्र. 01120 चे आरक्षण 18 फेब्रुवारीला सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाने सोमवारी जाहीर केले.





























































