लोकनाटय़ाचा आनंद अनुभवतोय – अधोक्षज कऱ्हाडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

सध्या रंगभूमीवर विविध विषयांवर नाटके येत आहेत. नुकतेच ‘येतोय तो खातोय’ हे लोकनाटय़ रंगभूमीवर आले आहे आणि या नाटकात काम करणारा एक प्रॉमिसिंग चेहरा म्हणजे अधोक्षज कऱहाडे.

कलेची आवड असणाऱया अधोक्षजचे मन नोकरीमध्ये रमले नाही. मोठा भाऊ संकर्षण कऱहाडे याने त्याला अभिनय  क्षेत्रात यायला प्रोत्साहन दिले.  अधोक्षजनेही संधी मिळेल तसे आपल्यातील टॅलेंट दाखवयाला सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तो वठवत आहे.  अल्पावधीतच त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.

अधोक्षज कऱहाडे मूळचा परभणीचा. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण परभणी येथूनच झाले. लहानपणापासून त्याला नाटकात काम करण्याची आवड होतीच. तसेच सूत्रसंचालन आणि निवेदन या गोष्टींमध्येही रस होता.  कॉमर्स शाखेत पदवीधर झाल्यावर त्याने काही काळ नोकरीदेखील केली, पण कलेची आवड असणाऱया अधोक्षजचे मन नोकरीमध्ये रमले नाही. दरम्यान, त्याचा मोठा भाऊ संकर्षण कऱहाडे हा अभिनय क्षेत्रात करीअर करू लागला होता. आज आपण संकर्षणला एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखतो. संकर्षणनेदेखील अधोक्षजला या क्षेत्रात यायला प्रोत्साहन दिले आणि मग त्यांचे सर्व कुटुंब 2010मध्ये मुंबईत आले. त्याच्या बाबांनादेखील अभिनयाची आवड आहे. बँकेतील नोकरी करता करता त्यांनीदेखील कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धांमधील नाटकांत तसेच काही प्रायोगिक नाटकांत भूमिका केल्या होत्या.

मुंबईत आल्यावर साधारण 2015च्या दरम्यान अधोक्षजने ‘अस्मिता’, ‘छोटी मालकीण’ अशा काही मालिकांत भूमिका केल्या. मग त्याला ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकात प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांसारख्या मान्यवर कलाकारांबरोबर  काम करण्याची संधी मिळाली. या नाटकात काही प्रयोगांत संकर्षण काम करत असे, तर काही प्रयोगांत तीच भूमिका अधोक्षज करत होता. त्यानंतर ‘लक्ष्य’, ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकांतही अधोक्षजने भूमिका केल्या. निवेदनाची आवड असल्याने काही टीव्ही चॅनेल्ससाठी काही प्रमोशनल उपक्रम होतात, त्याचे निवेदन अधोक्षज करत होता. सध्या ‘झी टॉकीज’वरील ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचे निवेदन तो करत आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकाबद्दल अधोक्षज म्हणतो, ‘‘मुळात हे लोकनाटय़ आहे आणि बऱयाच वर्षांनंतर एक चांगले लोकनाटय़ रंगभूमीवर आले आहे. यात गण, गवळण, लावणी, कटाव असे सर्व प्रकार आहेत. यात मी ‘खोकेलाल’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मुळात ऋषिकेश जोशी यांनी आमच्याकडून उत्तम तालीम करून घेतली आहे. संतोष पवार, भार्गवी चिरमुले, स्वप्नील राजशेखर, ऋषिकेशदादा असे अनेक उत्तम कलाकार या नाटकात असल्याने त्यांच्याकडूनही मला खूप काही शिकायला मिळते आणि एक वेगळे समाधान मिळते. समाज प्रबोधन करणाऱया या नाटकाचा मी एक भाग आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे.’’

अधोक्षजने सध्या काही जाहिरातींमध्येदेखील काम केले आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकाचे प्रयोग वेगळाच आनंद आणि समाधान देणारे आहेत, असेही तो म्हणतो.