
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धडाडणाऱया राजकीय नेते व उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची मनधरणी करता येणार आहे. यासाठी मकर संक्रांतीचा योग जुळून आला असून मतदान पदरात पाडून घेण्यासाठी कुठे संक्रांतीचे पाकीटस्वरूपी ‘वाण’ तर कुठे मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा लाभ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी अशा पाकीटबाजांना धडा शिकवण्यासाठी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज अॅलर्ट मोडवर आहे. मुंबईसाठी ही लढाई स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची असून रात्र वैऱयाची आहे. शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शिवशक्तीचे सैनिक जागता पहारा देत आहेत.
राज्यातील मागील साडेतीन–चार वर्षांपासून रखडलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह 29 महापालिकांच्या क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होता. शहरांमधले सर्व प्रमुख रस्ते, चौक आणि गल्लोगल्लीत सकाळ-संध्याकाळ निघणाऱया प्रचार रॅली तसेच छोटय़ा-मोठय़ा सभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण गजबजून गेले होते. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय नेत्यांनी कुठे सभा घेऊन प्रचाराची सांगता केली, तर काही नेते आणि उमेदवारांनी आपल्या प्रभागांत बाईक रॅली आणि पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता 15 जानेवारी रोजी होणाऱया मतदानासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत. आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त मतदान आपल्या पारडय़ात कसे पडेल या दृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
उमेदवारांचे जागते रहो!
आचारसंहितेमुळे उघड प्रचार होत नसला तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू राहणार आहे. शेवटच्या सत्रात आपण कोठे कमी पडू नये यासाठी डोळय़ात तेल घालून आता उमेदवारांना रात्र जागवावी लागणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटच्या क्षणापर्यंत करावी लागणार आहे.
निवडक कार्यकर्ते कामाला
पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या पंधरा दिवसांत प्रभागातील प्रत्येक कोपरान् कोपरा पिंजून काढण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी कुठे नाराजी तर कुठे सहकार्य मिळेल याचा अंदाज आल्याने निवडक कार्यकर्ते आता कामाला लागणार आहेत.
पैसेवाटपावर वॉच
सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून विरोधक पैसेवाटप करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आपल्या विभागात मतदारांना पैसेवाटपाचे प्रकार घडू नयेत म्हणून कार्यकर्त्यांना सज्ज केले आहे. त्यांच्याकडून विरोधकांच्या कार्यकर्त्यांवर वॉच ठेवला जात आहे.
शेवटची रात्र महत्त्वाची
उमेदवारी अर्ज भरल्यापासून सर्वच उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला. प्रचारामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर न करता पूर्णपणे प्रचार केल्यानंतर आता शेवटचा दिवस व शेवटची रात्र ही उमेदवार आणि त्याच्यासाठी झटणाऱया प्रत्येकासाठी महत्त्वाची राहणार आहे.
आदित्य आणि अमित ठाकरे यांचा झंझावात
शिवडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत दणदणीत बाईक रॅली काढण्यात आली.



























































