
वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 मधील तयार झालेल्या घरांचा ताबा रहिवाशांना देण्यासाठी विलंब का होतोय? याचा जाब शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना गुरुवारी पत्राद्वारे विचारला आहे.
म्हाडाच्या माध्यमातून वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात असून पहिल्या टप्प्यात 556 कुटुंबीयांना मार्चअखेरीस घराच्या चाव्या मिळणार होत्या. मात्र अजूनही रहिवासी घराच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना म्हाडा उपाध्यक्ष यांनी बिल्डिंगला ओसी येताच 15 मेपर्यंत घराचा ताबा दिला जाईल असे आश्वासन दिले होते. तीदेखील तारीख आता उलटून गेली आहे. म्हाडाकडून होत असलेल्या ‘तारीख पे तारीख’मुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांची पुन्हा एकदा घोर निराशा झाली आहे.
घरांचा ताबा कधी देणार, तारीख सांगा
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेय, वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज – 1 मधील जवळपास पूर्ण झालेला असून रहिवाशी नव्या घरांचा ताबा मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या टप्प्यातील घरांचा ताबा रहिवाशांना कधी देण्यात येणार आहे? याची अधिकृत माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे.