विकासाच्या आड येणाऱ्यांचा जनता धनुष्यबाणाने वध करेल – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न दहातोंडी रावणासारखे राज्यापुढे उभे आहेत. या रावणाचा वध करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. राज्यातील जनता 21 तारखेला धनुष्यबाणाने राज्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या दहातोंडी रावणाचा वध करेल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रहिमतपूर येथे झालेल्या विराट सभेत व्यक्त केला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयतक्रांती- शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम व सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, शिवसेना उपनेते नितिन बानुगडे- पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे आदी उपस्थित होते.

तुडुंब गर्दीने भरलेल्या महात्मा गांधी मैदानावर आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. या कार्यासाठी लोकांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, असे त्यांनी सांगितले होते. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. तुमचे मत महायुतीच्या उमेदवारांना मिळणार आहे, म्हणजेच जनतेचे आशीर्वाद मला लाभणार आहेत. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र उपाशीपोटी रहायला नको. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी 1000 भोजनालये सुरू करायची आहेत. फक्त दहा रुपयांमध्ये जेवण देण्याची आमची योजना आहे. यामुळे भुकेलेल्यांना अन्न मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. युवकांसाठी एक वर्षाची फेलोशिप, उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के आरक्षण, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी अडीच हजार बससेवा सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी नव्हे तर शंभर टक्के कर्जमुक्त करण्याचे अभिवचन मी देतो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना वार्षिक 10 हजार रुपये मदत देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असेल. राज्यातील रस्त्यांची एकूण अवस्था पाहता 50 हजार किलोमीटर लांबीचे बारमाही रस्ते आम्ही बनवणार आहोत. सध्याच्या विजेच्या दरात 30 टक्के कपात केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा देण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल उभारणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

सर्वत्र भगव वादळ उठले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराची गरज भासत नाही. महायुतीचे सातारा जिल्ह्यातील उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे. या मतदारसंघात रस्त्यांची समस्या गंभीर आहे, पाण्याचा प्रश्न उभा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे कराडची जनता 21 तारखेला मतपेटीद्वारे देईल. धैर्यशीलदादा तुमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नव्हे तर भ्रष्टवादीच्या आघाडीने जाती-जातीत, धर्माधर्मात, जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये जेवढी भांडणे लावता येतील तेवढी लावली. हे चित्र बदलायचे असेल तर परिवर्तन अटळ आहे आणि येथील जनता मतदानाद्वारे परिवर्तन करून दाखवेल असे ते म्हणाले.

उदयनराजे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या आत्मक्लेषाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ” शासनाने कृष्णा खोरेची स्थापना करून जिल्ह्यामध्ये पाणी अडवण्याचे मोठे काम केले. परंतु त्यानंतरच्या दहा वर्षात कालव्यांची कामे अपूर्ण राहिली, पुनर्वसनाचा प्रश्‍न गंभीर बनला. शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्याचवेळी आत्मपरिक्षण केले असते तर वेगळे चित्र दिसले असते.” तरुणांना वाव दिला पाहिजे असे म्हणणारे बोलतात एक आणि करतात दुसरेच. तरुणांना वाव हवा तर या वयात तिकीट पण मलाच पाहिजे हा अट्टाहास का, असा सवालही त्यांनी केला. लोकांचा विश्वासघात करणाऱ्यांना जनता घरी बसवेल. तुम्हाला घरी बसवायचे लोकांचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्याची वाटचाल नवमहाराष्ट्र निर्मितीकडे असेल, असा विश्वास व्यक्त करत उदयनराजे यांनी महायुतीच्या पाठीमागे जनतेने उभे रहावे असे आवाहन केले.

धैर्यशील कदम म्हणाले, “कराड उत्तरच्या निष्क्रिय आमदारांनी गेली दहा वर्षे जनतेला केवळ झुलवत ठेवले. भागातील एकही रस्ता चांगला नाही. 20 वर्षे नेतृत्व करत असताना त्यांनी जनतेला केवळ स्वप्न दाखवण्याचे काम केले. स्वतःच्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचे काम जो करू शकत नाही, तो जनतेच्या अपेक्षा कधी आणि कशा पूर्ण करणार. नाकर्त्या लोकप्रतिनिधींना घरी घालवायचे आहे आणि हेच काम येत्या आठ दिवसात तुम्हाला करायचे आहे.” उदयनराजेंना कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रात पाठवायचे आहे आणि त्यासाठी मतदारांचा आशीर्वाद हवा आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रा. नितीन बानुगडे पाटील, कांताताई नलावडे, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांचीही भाषणे झाली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल शेजवळ, रहिमतपुरच्या नगरसेविका रुख्मिणीताई सुतार, जिल्हा संघटीका चित्रा महाडीक, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम, पं. स. सदस्या विजयाताई गुरव, रविंद्र भोसले, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते भीमरावकाका पाटील, रामकृष्ण वेताळ, संपतरावदादा माने तसेच पंचक्रोशीतील शिवसेना-भाजप महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.