
विश्वासघात करून सत्तेत आलेल्या ‘मिंधे’ गटाच्या गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आताच महापालिका आणि विधानसभा निवडणूक घ्यावी, असे खुले आव्हान आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिले. आपल्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात एक ‘सीएम’ आणि एक ‘सुपर सीएम’ काम करीत असल्याचा घणाघाती टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
अंधेरी पूर्व गुंदवली येथील शाळेत शिवसेना पक्षाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या प्रयत्नाने आणि रुतुजा लटके यांच्या पाठपुराव्याने सुरू झालेल्या जुनियर केजी आणि सीनियर केजी वर्ग नूतनीकरण शुभारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या कामाने झाल्याचे सांगत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूकच काय, तर नवीन वर्षात सरकारने 40 गद्दार आमदार आणि 13 खासदारांच्या जागी निवडणूक घेण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. इतर राज्यातील मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी, पर्यटन वाढीसाठी, फिल्म जगताच्या वाढीसाठी, गुंतवणूक वाढवण्यासाठी येतात. आम्हीदेखील डाओस येथून साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. मात्र गद्दारांनी सरकार पाडले, असे सांगतानाच आपले सीएम दिल्ली, गुवाहाटी अशा ठिकाणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला लगावला. उद्योग-व्यवसायांच्या वाढीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही दर बुधवारी ‘एमएमआरडी’मध्ये बैठक घेऊन पालिकेसह सर्व 16 इतर प्राधिकरणांसोबत आढावा घ्यायचो. मात्र सध्या ही पद्धत बंद असल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. मुंबई ही सांस्कृतिक राजधानी असल्याने कुणी कितीही प्रयत्न केले तरी इथून कुणी उत्तर प्रदेशला कायमस्वरूपी जाणार नाही, केवळ शूटिंगसाठी जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
…तर आयुक्तांवर कायदेशीर कारवाई
महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना स्थायी समिती, महासभेने मंजूर केलेली 1700 कोटींची कामे पालिका आयुक्त प्रशासक म्हणून काम करीत असताना आता कशी काय बदलू शकतात, असा सवालही त्यांनी यावेळी केला. शिवाय आता सुरू असलेल्या 7 हजार कोटींच्या कामांच्या खर्चात किती वाढ झाली याची माहिती समोर यायलाच हवी, असे ते म्हणाले. सात हजार कोटी खर्च इथे खर्च करता मग ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर येथील कामे का झाली नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे मुंबईकरांचा पैसा लुटण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सांगतानाच प्रशासकाचा कारभार आणि खर्च याचा आम्ही कायदेशीर अभ्यास करीत आहोत. हा प्रकार आम्ही कायदेशीर मार्गानेच रोखणार आणि चुकीचा प्रकार घडला असल्यास आयुक्तांवर कायदेशीर कारवाई होईल, असेही ते म्हणाले.
बिल्डरसाठी थीम पार्क मुलुंडला हलवण्याचा घाट
महालक्ष्मी रेसकोर्स येथे भव्य थीम पार्क करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी अभ्यासपूर्वक करण्यात येत होती. बिल्डरचा फायदा न पाहता काम पुढे नेत होतो. मात्र खोके सरकारने आता बिल्डरच्या फायद्यासाठी या ठिकाणचे थीम पार्क मुलुंडच्या खासगी जागेत हलवण्याचा घाट घातल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. थीम पार्कसाठी जागा शासकीयच हवी, असेही ते म्हणाले.






















































