प्राइस टॅग लावलेले लोक आपल्याला नको! आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलसारखे प्राइस टॅग लावलेले लोक आपल्याला नको आहेत. ज्यांच्या मनात, हृदयात शिवसेना आहे अशी लोकं आपल्याला हवी आहेत. कारण अशीच लोकं समाजासाठी काम करू शकतात, असे मत शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नगरसेवकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. लोकांना बंड करण्याची किंवा दुसऱया पक्षात जाण्याची मुभा आहे. पण त्यांनी कोणत्या वेळेचा फायदा उचलला? तर जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ते घराबाहेर पडू शकत नव्हते. त्या वेळेचा गैरफायदा त्यांनी स्वतःसाठी घेतला. शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितले आहे की, आम्ही कुणालाही थांबवणार नाही, ज्यांना जायचे आहे त्यांनी जा, कारण मनाने तिथे आणि शरीराने येथे, असे लोक आपल्याला नको. ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे अशीच लोकं हवी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.