
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रशस्त हॉल, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक अशा अनेक सुविधा कांदिवलीच्या बंदरपाखाडी परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कांदिवली बंदरपाखाडी गाव येथील मुंबई पब्लिक स्कूलचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वरदेखील उपस्थित होते.
मुंबई महापालिकेने सुमारे 10 कोटी 33 लाख रुपये खर्च करून पाचमजली शाळा बंदरपाखाडी येथे बांधली आहे. त्यामुळे बंदरपाखाडी, गणेश नगर आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्री-प्रायमरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथे घेता येणार आहे. संगणक विभाग, प्रशस्त हॉल, खेळाचे मैदान, अत्याधुनिक प्रयोगशाळा अशा खासगी शाळांच्या धर्तीवर सुविधा या शाळेत उपलब्ध आहेत. आतापर्यंत 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहेत.
एखादी नवीन शाळा सुरू करणे, तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे काम खूप महत्त्वाचे आहे. शाळेच्या माध्यमातून शिक्षण देऊन नवीन पिढी घडवण्याचे काम होत असते. त्यामुळे कोणत्याही शाळेचे लोकार्पण करताना मला सर्वात जास्त आनंद होतो, अशी भावना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. या शाळेसाठी तत्कालीन शिक्षण समिती अध्यक्षा सुभदा गुडेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचेही आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले.
यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, नगरसेविका शुभदा गुडेकर, विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, नगरसेवक दीपक (बाळा) तावडे, सहआयुक्त मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
भाषेप्रमाणे टेक्नोलॉजीदेखील महत्त्वाची
पालिकेच्या शाळेत नऊ विविध माध्यमांतून सव्वातीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक भाषा जेवढी महत्त्वाची आहे तितकीच टेक्नोलॉजीदेखील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने 2013 पासून पालिका शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम सुरू झाले. आज पालिका शाळेतले 54 हजार विद्यार्थी टॅबवरून शिक्षण घेत आहेत. या सगळ्या गोष्टी जगभरात नसतील, पण महापालिकेच्या शाळांमध्ये नक्कीच आहेत. जगाला अभिमान वाटेल असे काम पालिकेचा शिक्षण विभाग करीत आहे असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
पालिकेचा शिक्षण विभाग हा पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम आम्ही राबवत असतो. यापुढेही या विद्यार्थ्यांसाठी जे काही चांगले करता येईल ते आम्ही नक्कीच करू. पुढच्या काही वर्षांत देशाला नवीन दिशा देणार्यांमध्ये पालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल, अशी आशाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.






























































