मियावाकी वनाची निर्मिती पर्यावरणाचा समतोल राखणारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाने मियावाकी वनाची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे आणि सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासला आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिशन ग्रीन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात मियावाकी पद्धतीने ‘निसर्ग उपवन’ फुलवले जात आहे. त्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

म्हाडाच्या प्रांगणात 40 वेगवेगळ्या प्रजातींची 300 झाडे लावण्याचा उपक्रम माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबवण्यात येत आहे. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, शुद्ध हवा व पाणी यावर प्रत्येक नागरिकाचा नैसर्गिक हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरणाच्या संवर्धनाकरिता जबाबदारी उचलावी. किमान जागेत कमाल प्रमाणात झाडांची वाढ करता येते, हे जपानी पद्धतीच्या मियावाकी वनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर म्हणाले, म्हाडातील मियावाकी वने विकसित करताना देशी, औषधी प्रजातीच्या वृक्षांच्या अधिक महत्त्व दिले आहे. फळझाडे, फुलझाडांचा समावेश असलेल्या झाडांचाही समावेश आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडाचे उपाध्यक्ष-सीईओ अनिल डिग्गीकर, मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, योगेश म्हसे, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, सहमुख्य अधिकारी जीवन गलांडे, उपमुख्य कार्यकारी मनीषा जायभाये-धुळे, अभियानाचे ब्रँड अँबेसेडर सुभोजीत मुखर्जी, अमित सावंत आदी उपस्थित होते. म्हाडातील मियावाकी वनाच्या उभारणीत योगदान देणाऱया म्हाडातील उपअभियंता भावेश गायकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, सर्जेराव आढाव, सी. जी. गोसावी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.