कल्पकतेने मुंबईचे सौंदर्य खुलविणार; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कलानगर जंक्शन येथील सौंदर्यीकरणाचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या भेडसावत होती. आता एमएमआरडीए, महापालिका यांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वाहतूक जंक्शनच्या जागेचा कल्पकतेने उपयोग करून वाहतूक सुरळीत केली जात आहे. याचबरोबर नागरिकांसाठीही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कलानगर प्रमाणेच मुंबईत सर्वत्र अशा सुविधा निर्माण करून कल्पकतेने मुंबईचे सौंदर्य खुलविणार, अशी ग्वाही पर्यटनमंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

वांद्रे पूर्व येथील कलानगर जंक्शनच्या सुधारणा व सौंदर्यीकरणाच्या कामाचा शनिवारी पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, कलानगर येथेच आपला जन्म झाल्याने या परिसरातील स्थित्यंतरे आपण पाहिली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या परिसरातील वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कलानगर जंक्शनचे रूप बदलले असून याचा वाहनधारकांसह रहिवाशांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. बीकेसी या जागतिक व्यापार केंद्राचे हे प्रवेशद्वार असल्याने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय सिस्टर सिटींचे झेंडे येथे उभारण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार झिशान सिद्दीकी, नगरसेवक रोहिणी कांबळे, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.

जंक्शनचा कायापालट

कलानगर जंक्शन येथे उत्तर प्लाझा, दक्षिण प्लाझा आणि बेट प्लाझा अशा तीन बेटांचा विकास करण्यात आला आहे. यामध्ये लँडस्केपिंगसह आधुनिक पद्धतीचे पाण्याचे कारंजे, बसण्यासाठी ग्रेनाईटचे बाक, फूटपाथ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत असलेल्या झाडांभोवती सुशोभिकरणाद्वारे कुंपण घालण्यात आले आहे. याशिवाय विद्युत शिल्प, विविध प्रकारची फुलझाडे, मुलांना खेळण्यासाठी जागा या बाबीसुद्धा येथील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.

कलानगर जंक्शनचे क्षेत्रफळ सुमारे 8690 चौरस मीटर आहे. कलानगर जंक्शनवर मोठय़ा संख्येने वाहतूक सुरू असते. त्यामुळे पादचाऱयांसाठीही ते धोकादायक होते. यावर मात करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत या परिसराचा विकास करण्यात आला आहे. यामुळे वांद्रे रेल्वेस्थानक आणि वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणाऱया पादचाऱयांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल. पादचाऱयांना रस्ता ओलांडण्यासाठी सुलभता व्हावी यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यादृष्टीने बेटांवर पुरेशी विद्युत व्यवस्थाही उभारण्यात आली आहे.