बिबट्यांच्या शिकारीला परवानगी देऊ नका! आदित्य ठाकरे यांची विधानसभेत मागणी; लेपर्ड मॅनेजमेंट प्रोग्रॅम बनवण्याची केली सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबट्यांना अनुसूची-1 मधून अनुसूची-2 मध्ये टाकण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी बिबट्यांच्या शिकारीला परवानगी देऊ नका, लेपर्ड मॅनेजमेंट प्रोग्रॅम बनवा, अशी सूचना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत वन्यजीव संरक्षण विधेयकावरील चर्चेत बोलता केली. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी कुठल्याही प्राण्याला मारण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली.

वन्यजीव संरक्षण (सुधारणा) विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाचा मुख्य उद्देश राज्यात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, विशेषतः बिबट्यांचे हल्ले रोखणे हा आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी काही विशिष्ट वन्यप्राण्यांचे (बिबटय़ा) संरक्षण श्रेणीतील स्थान बदलून त्यांचे व्यवस्थापन अधिक सुलभ करण्याचे या विधेयकात प्रस्तावित आहे. आदित्य ठाकरे यांनी या विधेयकाला पाठिंबा देतानाच काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. संरक्षण श्रेणी बदलल्याने शिकार किंवा अवैध व्यापाराचा धोका वाढू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला ‘बिबटय़ा व्यवस्थापन कार्यक्रम’ राबवण्याची मागणी केली.

कायद्यातील या सुधारणेचा वापर वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी परवाने देण्यासाठी केला जाऊ नये, तर केवळ त्यांचे स्थलांतर आणि संवर्धन यावर लक्ष केंद्रित करावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ग्रामीण भागातील आमदार सांगताहेत, बिबट्यांची संख्या वाढत चाललीय. पण बिबट्यांना शेडय़ूल-2 मध्ये आणून काहीच साध्य होणार नाही. लेपर्ड मॅनेजमेंट प्रोग्रॅम बनवला पाहिजे. 2011-12 मध्ये वनखात्याने त्याबाबत सादरीकरण केले होते. जवळपास 25 राज्यांमध्ये जिथे बिबटय़ाचा वावर आहे तिथेही हे सादरीकरण दिले होते याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्षवेधले.

शेडय़ूल-1 मध्ये डेंजर टू लाईफ असेल तर चीफ वाईल्डलाईफ वॉर्डनला शिकार किंवा ट्रान्सलोकेटची परवानगी आहे. शेडय़ूल-2 मध्ये डेंजर टू लाईफ ऑर प्रॉपर्टी असे आहे. म्हणजे शेतात, उसात बिबटय़ा यायला लागला तर त्याला तिथून काढण्याची जबाबदारी आपण सीसीएफ किंवा स्थानिकांवर टाकू शकतो. पण यातून भलतेच प्रॉब्लेम होऊ शकतात, शिकारीला परवानगी दिली जाऊ शकते. एका बिबटय़ाला स्थलांतरित केले तर त्याची जागा दुसरा प्राणी घेऊ शकतो, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी ‘अवनी’ला मारले गेले, ‘नवाब’ला आणले. त्याला मारले गेले अशी वाघांच्या शिकारींची उदाहरणे दिली.