इमारत कोसळली परंतु स्थानिक आमदार गुवाहाटीत, कुर्ल्यात आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री दुर्घटनाग्रस्तांची घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही चार मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. ही दुर्घटना घडली असताना कुर्ला विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर हे मात्र गुवाहाटीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पर्यटन, पर्यावरण आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री दोन वाजता घटनास्थळी पोहोचून दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली.

कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ रात्री 2 वाजता कुर्ल्यातील इमारत दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी, संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधत त्यांनी मदत व बचावकार्य वेगात सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच, या दुर्घटनेत आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रती ठाकरे यांनी संवेदना व्यक्त केल्या. तसेच जे लोकं जखमी झाले आहेत ते लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

पालिकेकडून नोटीस आल्यास इमारती खाली करा, आदित्य ठाकरेंची विनंती

ज्या इमारतींना पालिकेने नोटीस पाठवली असेल त्या इमारतीमधील नागरिकांनी इमारती खाली कराव्यात अशी कळकळीची विनंती यावेळी आदित्य ठाकरे यांनी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना केली. मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुनर्तपासणी करण्यात येईल. मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारी नोटीस रहिवाशांनी घ्यावी आणि लवकरात लवकर अशा इमारती खाली कराव्यात. त्यामुळे, महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा परिस्थितीत काम करणं मदतीचं ठरेल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.