रावणराज्य चालवणारे अयोध्येला चाललेत, आम्ही महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हे कलियुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, पण आम्ही महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला.

अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला चांगलेच सुनावले. आदित्य ठाकरे म्हणाले, रघुकुल रित सदा चली आये, प्राण जाये पर वचन न जाये, हे आमचे ब्रीदवाक्य आहे. जी जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत ती आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि सगळय़ात महत्त्वाचे वचन तर हेच आहे की, लोकशाहीसाठी, संविधानाच्या रक्षणासाठी वज्रमूठ प्रत्येक जिल्ह्यात जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मिंध्यांना रामाचे विचार झेपणार नाहीत – अंबादास दानवे
मिंधे गटाचा अयोध्या दौरा फक्त दिखावा असून, रामाचे विचार यांना कधीच झेपणार नाहीत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला. भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कृपेने मिळालेला धनुष्यबाण त्यांनी चोरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या हाती तो कधीच शोभणार नाही, असे दानवे म्हणाले.