सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह नाही- आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

सरकारच्या विरोधात बोलणे हा जनतेचा हक्कच आहे आणि जर कोणी सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही असे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे सरकारला ठणकावले. विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असून शहरवासीयांना आम्ही जे वचन दिले होते ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाहीदेखील आदित्य ठाकरे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिटी बससेवेचा शुभारंभ आणि भूमिगत गटार योजनेतून नक्षत्रवाडी येथे बांधण्यात आलेल्या 161 एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्लाण्टचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज रविवारी करण्यात आले. याप्रसंगी क्रांती चौक येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यापूर्वी मी शहरात आलो असता सर्वसामान्य जनतेसाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याचे दिसून आले. त्यावेळी मी परिवहनमंत्री दिवाकर रावते, तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम, शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर व आयुक्तांची छोटेखानी बैठक घेतली असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, या बैठकीत शहर वाहतुकीसाठी सिटी बस सुरू करावी अशी सूचना आपण केली होती. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारने संभाजीनगर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करून महानगरपालिकेने शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. युतीने दिलेल्या वचननाम्याची ही पूर्ती आहे.

50 वर्षांचे नियोजन हवे!
दर पाच वर्षांनी निवडणुका येतात. जे कोणी निवडून येतील त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. पाच वर्षे कधी निघून जातात हे कळत नाही. निवडून येणाऱया लोकप्रतिनिधींनी केवळ पाच वर्षांचा विचार न करता पुढच्या 50 वर्षांच्या विकासाचे नियोजन करायला हवे. तरच शहर विकासाला खऱया अर्थाने चालना मिळू शकेल, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.

‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना उद्देशून लिहिलेले खुले पत्र दिले. त्याचा उल्लेख करून आदित्य ठाकरे म्हणाले की, या पत्रात विकासाला हातभार लावणाऱया गोष्टी असतील तर त्याचा नक्कीच विचार करू. प्रारंभी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहर बससेवेचा विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बसमध्ये जाऊन पाहणी केली.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. व्यासपीठावर महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, जि.प. अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

एसटीपी प्लाण्टचे थाटात लोकार्पण
लहान व मध्यम शहराकरिता पायाभूत सुविधा उपाययोजनांतर्गत भूमिगत गटार योजनेतून नक्षत्रवाडी येथे बांधण्यात आलेल्या 161 एमएलडी क्षमतेचे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लाण्टचे लोकार्पणही शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील सर्वात अत्याधुनिक असा प्लाण्ट उभारल्याबद्दल आयुक्त डॉ. निपुण विनायक, ठेकेदार खिल्लारी, संदीप अस्वलकर, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, अनिल तनपुरे यांचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘एमआयएम’च्या आमदाराची आदित्य ठाकरेंवर स्तुतिसुमने
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची दोन ते तीन वेळा भेट झाली. यांच्यासारखे विचार आणि विकासाचा दृष्टिकोन असलेला नेता सक्रिय राजकारणात असल्याने देशाला चांगले भवितव्य आहे, असे उद्गार एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी काढले. ते म्हणाले, मी भगवा फेटा बांधल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली. हा भगवा रंग राष्ट्रध्वज तिरंग्यामधील आहे. हा रंग माझ्या डोक्यावर सरताज म्हणून मी बांधला आहे.

ही तर शिवसेनाप्रमुखांची शिकवण!
आमदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी अजानच्या वेळी महापौरांचे भाषण थांबवल्याचे कौतुक केले होते त्याचा धागा पकडत आदित्य ठाकरे म्हणाले की, जलील यांनी भगवा फेटा बांधला, तर अजान सुरू झाल्यानंतर मी महापौरांचे भाषण थांबवले. यापूर्वीही बुलढाणा येथे अजान सुरू होताच मी भाषण थांबवले होते. मी वयोवृद्ध व्यक्तींचे घेतलेले दर्शन, तेही सोशल मीडियावर व्हायरल झाले, बातम्या आल्या. यात माझे कौतुक करण्यासारखे खरे तर काहीच नाही. ही तर माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. जनताजनार्दन हा राजा आहे. त्याला देव मानले पाहिजे हेच आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवले आहे.