काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना घरी बसवा, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

‘सातारा जिल्ह्यात खूप काही करण्यासारखे आहे, मात्र दहशतीमुळे येथे उद्योग व्यवसाय कारखानदारी येत नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता घरी बसवा’, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कोरेगाव येथील बाजार मैदानावर महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

‘काहीही झाले तरीही देशात पुन्हा एनडीएचे सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षात बसणारा खासदार हवाच कशाला. विरोधक देश तोडायला निघालेत. त्यामुळे देश अखंड व भगवा ठेवण्यासाठी महायुतीला मत द्या. सातार्‍यातील दहशतीला का घाबरता? हातात भगवा घ्या मग कोणीही चिरीमिरी समोर येण्याचे धाडस करणार नाही. एक चहावाला नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान होऊ शकतो मग आपल्यातीलच एक माथाडी कामगार असलेले नरेंद्र पाटील हे साताऱ्याचे खासदार होऊ शकत नाही का? सातार्‍यामध्ये नरेंद्र पाटील यांना मत म्हणजेच दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांना मत असे समजून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना घरी बसवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.

नरेंद्र पाटील म्हणाले, या निवडणुकीत मी उदयनराजेंना पाडणारच आहे. निकालानंतर ते माजी खासदार होतील. गेल्या दहा वर्षात काय कामे केली असा प्रश्न विचारला तर ते शत्रुघ्न सिन्हांसारखं खामोश असा डायलॉग मारतात. पैशासाठी सोना अलाइज कंपनी बंद पाडून अडीच हजार कामगारांना बेकार करणारे हे गरिबांच्या जिवावर जगतात. गेल्या दहा वर्षात खासदारांनी किती विकास केला. किती कारखाने घालवलेत याचा हिशोब दिला पाहिजे. भाजप शिवसेनेने केलेली कामे आपण केल्याचे सांगतात. दुसर्‍याच्या पोराला आपलं पोर आहे, असे किती दिवस सांगणार आहात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे उपनेते नितिन बानुगडे पाटील, ना. नरेंद्र पाटील, माजी आमदार दगडू सपकाळ, पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, मालोजी भोसले, दत्ताजीराव बर्गे, निलेश बर्गे, अक्षय बर्गे, आदी प्रमुख उपस्थित होते