
दक्षिण मुंबईत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारी महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा घणाघात आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘खोके’ सरकारवर केला. या ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘हाईड पार्क’च्या धर्तीवर कोणतेही बांधकाम नसलेले भव्य उद्यान विकसित करण्यात येणार होते. मात्र सध्याचे सरकार बिल्डरांच्या फायद्यासाठी मुंबईकरांच्या हक्काची मोकळी जागा नष्ट करून या ठिकाणी काँक्रिटचे जंगल उभारण्याचे षड्यंत्र असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुलुंडला हलवून महालक्ष्मीला ‘थीम पार्क बांधण्या’ची योजना पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे मुंबईकरांच्या हक्काची मोकळी जागा विकासकाला देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य-मुंबईकरांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘खोके’ सरकारच्या बिल्डरधार्जिण्या धोरणाची पोलखोल केली. याआधी वरळी डेअरीची जागा बिल्डरच्या घशात घालण्याची पूर्ण तयारी सरकारने केलीच आहे. याच धर्तीवर महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरांना विकण्याचा सरकारचा डाव असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
अशी होती योजना
उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार रेसकोर्सच्या ठिकाणी ‘अर्बन ग्रीन पार्क’ तयार होणार होते. या ठिकाणी मुले, ज्येष्ठ, रनर, योगाप्रेमी, संगीतप्रेमी, कलाप्रेमी, पेट-हॉर्स प्रेमींसाठी मोकळे उद्यान तयार करण्यात येणार होते. मात्र मुलुंड आणि रेसकोर्सच्या जागा बिल्डर-व्यावसायिकांसोबतचे हितसंबंध जपण्यासाठी विक्री करण्यात येणार असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
असे आहे प्रकरण
रेसकोर्स मैदानाचा भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब या संस्थेला 99 वर्षाच्या लिजवर देण्यात आला होता. या भूखंडाचा भाडेपट्टा करार 2013 मध्ये संपला आहे. रेसकोर्सवरील एकूण 8 लाख 55 हजार 198 चौरस मीटर जागेपैकी 2 लाख 58 हजार 245 चौरस मीटरची जागा पालिकेच्या मालकीची असून 5 लाख 96 हजार 953 चौरस मीटरची जागा राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या ताब्यातील जमीन ताब्यात घेण्यासाठी दहा वर्षांपासून पालिकेचे पुन्हा प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईकरांच्या हक्कासाठी लढणार
मुंबईकरांच्या हक्काची विनामूल्य जागा बिल्डर, व्यावसायिकांना देण्याचा हा डाव आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. मुंबईकरांच्या हक्काची जागा मुंबईकरांसाठीच वापरली जावी यासाठी आम्ही लढत राहू, अशी ठाम भूमिकाही आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स हा मुंबई शहराचा अविभाज्य भाग आहे. या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोणत्याही बांधकामाशिवाय ‘द हाईड पार्क’सारखी मोकळी जागा असणारे उद्यान विकसित करण्याची योजना होती. ही जागा सर्वांसाठी मोफत उपलब्ध केली जाणार होती. मात्र खोके सरकार ही जागा बिल्डरच्या घशात घालू पाहतेय.
आदित्य ठाकरे, शिवसेना नेते
































































