आघाडीला माहूरच्या पापनाशक तलावात बुडवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । माहूर

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने निर्माण केलेले पाप मिटविण्यासाठी देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याची घोषणा त्यांनी जाहीरनाम्यात केली आहे. अशाप्रकारे अतिरेकी प्रवृत्तींचे समथर्न करणाऱया काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला या निवडणुकीत धडा शिकवा आणि त्यांना श्रीक्षेत्र माहूरगडच्या पापनाशक तलावात बुडवा, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

माहूरगड येथे रेणुका देवीचे दर्शन करून त्यांनी आज हिंगोलीतील मतदारांशी संवाद साधला, तेव्हा ते बोलत होते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांच्यात आपापसात भांडणे लावून काँग्रेस-राष्ट्रवादीने आपापल्या पोळय़ा भाजून घेतल्या. सिंचनाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार करून शेतकऱयांना देशोधडीला लावले. गेली अनेक वर्षे सत्ता त्यांच्या हातात होती; परंतु बेरोजगार, शेतमजूर, शेतकरी यांच्यासाठी कुठलेही काम केले नाही. मराठवाडय़ात भयंकर दुष्काळ पडला असून त्यासाठी मी मराठवाडय़ात फिरलो. दुष्काळाची पाहणी करताना शेतकऱयांचे दुःख जाणून घेतले. प्रसंगी त्यांना पशुखाद्य दिले. त्या काळात काँग्रेसचा एकही नेता किंवा कार्यकर्ता शेतकऱयांचे अश्रु पुसण्यासाठी पुढे आला का? फिरला का? लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिह्यांत मी फिरलो.

शिवसेनेचे हिंगोली मतदारसंघातील उमेदवार आमदार हेमंत पाटील, शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, हिंगोली/नांदेड युवसेनेचे विस्तारक अमित गीते यावेळी उपस्थित होते.