शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी लातूर जिल्हा दौऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी 11 फेब्रुवारी रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट ते घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या जनावरासाठी चाऱ्यांचे वाटप आणि पाण्याच्या टाक्यांचे वाटप त्यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनेचे सहसचिव तथा जिल्हा विस्तारक प्राध्यापक सुरज दामरे यांनी दिली.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त भागांत भेट देत आहेत. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे 11 फेब्रुवारी रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी 10:30 वाजता त्‍यांचे लातूर येथील विमानतळावर आगमन होणार आहे. तिथून ते औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. औसा तालुक्यातील चलबुर्गा येथे 11.45 वाजता चलबुर्गा आणि परिसरातील शेतकऱ्यांची दुष्काळासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर 12.15 वाजता किल्लारी येथे भेट देणार आहेत. यावेळी दुष्काळाची पाहणी आणि चर्चा न करता थेट शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. जनावरांसाठी चारा दिला जाणार आहे. पाण्याच्या टंचाईची स्थिती लक्षात घेऊन पाण्याच्या टाक्यांचे वाटप केले जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेना सहसचिव प्राध्यापक सुरज दामरे यांनी केले आहे.