आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गझदरबंद पंपिंग स्टेशनचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सांताक्रुझ-जुहूजवळील पालिकेच्या गझदरबंद पंपिंग स्टेशनचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यामुळे वांद्रे, जुहू, सांताक्रुझ परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे. या ठिकाणचे सहा पंप दर सेकंदाला प्रत्येकी सहा हजार लिटर पाणी बाहेर फेकणार आहेत. तीन वर्षांपासून रखडलेल्या पंपिंग स्टेशनसाठी शिवसेनेने पाठपुरावा केला.

जुलै 2005मध्ये मुंबईत अतिवृष्टीत झालेल्या जीवित-वित्तहानीमुळे तुंबणाऱया पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने महत्त्वाच्या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचे धोरण आखले आहे. यानुसार गझदरबंद हे सहावे पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सहा पंप असून या प्रत्येक पंपातून प्रतिसेकंद सहा हजार लिटर पाणी बाहेर फेकले जाणार आहे. त्यामुळे या परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार आहे. या वेळी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर,  प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रशेखर वायंगणकर, नगरसेविका स्नेहल आंबेकर, रोहिणी कांबळे, आमदार अमित साटम, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते. हे काम काही कारणांमुळे तीन वर्षे रखडल्यानंतरही नव्या कंत्राटदाराने सात महिन्यांत 62 काम पूर्ण केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. माहुल आणि मोगरा नाला येथील पंपिंग स्टेशनसाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू होणार आहे.

मिठी नदी पर्यटन स्थळ बनेल – महापौर

मिठी नदीच्या सौंदर्यीकरणामुळे नदी प्रदूषणमुक्त होणार असून या ठिकाणी पर्यटनस्थळ बनेल, असा विश्वास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला. मिठी नदीच्या सौंदर्यीकरणासाठी आतापर्यंत 600 कोटी तर राज्य शासनाने 400 कोटी रुपये खर्च केल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, तलांवात सध्या कमी पाणीसाठा असला तरी राखीव कोटा वापरला जात असून मुंबईकरांवर आणखी पाणीकपात लादावी लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.