कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांनी वृद्ध शेतकऱ्याच्या घरी जाऊन केले व्हेरिफिकेशन!

1122

एखाद्या पात्र वयोवृद्ध शेतकरी जर आधार व्हेरिफिकेशनसाठी बँकेपर्यंत येऊ शकत नसेल तर त्यांचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आता प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन त्यांची ओळख पटवून त्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावामध्ये अधिकाऱ्यांनी हे काम केले आहे. तसेच कर्जमाफीसाठी आतापर्यंत 678 जणांचे व्हेरिफिकेशन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली आहे.

अनेक वृद्ध अथवा ज्यांना चाललेही कठीण आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना आता त्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळावा या उद्देशाने प्रशासनाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने काल रात्री नऊच्या सुमाराला ब्राह्मणी गावातील वृद्ध शेतकऱ्याच्या घरी जाऊन आधार व्हेरिफिकेशन करून घेतले आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचे कौतुक केले आहे. कोणतीही कागदपत्रे न देता अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने कर्जमाफी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगर तालुक्यातील जखनगाव आणि राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावाची निवड करण्यात आली होती. एकूण 972 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा सहकारी बँकेने प्रत्येक शाखेमध्ये बायोमेट्रिक मशीन लावल्य़ा आहेत. सोमवारपासून प्रत्यक्ष कर्जमाफीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन्ही गावातील 972 शेतकऱ्यांपैकी मंगळवार दुपारपर्यंत 678 शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन झाले आहे. एक-दोन दिवसांमध्ये त्यांचे पैसे बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहेत. आतापर्यंत ब्राह्मणीती 257 व जखणगाव मधील 37शेतकरी यांचे आधार व्हेरिफिकेशन शिल्लक आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे. दोन जणांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांचे आधार कार्ड मॅच होण्यासाठी त्यांच्या अंगठ्याचे ठसे हे मॅच होत नाहीत. त्यामुळे त्या तक्रारी तात्काळ 48 तासात निकाली काढण्यात येणार आहेत. तहसीलदारांना समोर त्यांची ओळख पटवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या