देवगड तालुक्यात 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

देवगड तालुक्यातील 21 ग्राम पंचायतींच्या 147 जागांकरिता 308 उमेदवारांचे भवितव्य 15 जानेवारीला मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी देवगड तालुक्यातील महसूल यंत्रणेसह पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व अधिकारी,कर्मचारी 17 खाजगी वाहनांमधून मतदान यंत्रांसह मतदान केंद्रात पोलीस बंदोबस्तात रवाना झाले आहेत.

तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मारुती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्तात सर्व मतदान यंत्रे व अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले. यावेळी महसूल नायब तहसीलदार जि. के.सावंत,निवासी नायब तहसीलदार एस.व्ही गवस,वरिष्ठ लिपिक महेश चव्हाण,व्ही.आर.वेंगुर्लेकर,विनायक शेट्ये, ए.ए.गिरी उपस्थित होते.

देवगड तालुक्यात एकूण 23 ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी रहाटेश्वर, मोंडपार या प्रत्येकी 7 जागांच्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असल्याने 15 जानेवारीला 21 ग्राम पंचायतींच्या निवडणूका होत आहे. यासाठी 21 निवडणूक निर्णय अधिकारी, 60 मतदान केंद्रावर 240 कर्मचारी ,60 पोलीस कर्मचारी, तसेच 60 शिपाई सज्ज आहेत.

देवगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या नेतृत्वाखाली 6 पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी , होमगार्ड 60, स्टायकिंग फोर्स आरसीपी 10,मतदान यंत्र स्ट्रॉग रूम हत्यारी गार्ड 5 असा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देवगड तालुक्यात 21 ग्राम पंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणूक मतमोजणी निकाल 18 जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे. देवगड तालुक्यातील ग्राम पंचायत कातवण, टेंबवली, पाटथर, धालवली, कोरले, पाळेकरवाडी, गंढिताम्हणे, मोंड,तांबळडेग लिंगडाळ,मुणगे, मिठबाव, इळये, कुणकेश्वर, वाडा, मुटाट, नाडण, वरेरी, तळवडे, पुरळ, शिरगाव या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या