आर्टस्, कॉमर्सने यंदाही सायन्सला मागे टाकले! अकरावीची पहिली यादी जाहीर

30


सामना ऑनलाईन, मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली असून आर्टस्, कॉमर्सने यंदाही सायन्सला मागे टाकले आहे. सायन्सपेक्षा आर्टस् आणि कॉमर्सचा कटऑफ चढा असल्याचे या यादीतून स्पष्ट झाले. मुंबईतील नामांकित एचआर, केसी, जयहिंद, रुईया, मिठीबाई, झेवियर्स या कॉलेजच्या आर्टस् शाखेचा कटऑफ हा सायन्स शाखेच्या कटऑफपेक्षा 1 ते 8 टक्क्यांनी अधिक आहे.

यंदाच्या गुणवत्ता यादीत सायन्स शाखेचा सर्वाधिक कटऑफ हा वाशी येथील फादर ऍग्नेल मल्टिपर्पज कॉलेजचा  आहे. या कॉलेजची कटऑफ 93.4 टक्के असून यंदा प्रथमच या कॉलेजने माटुंगा येथील रुईया कॉलेजलाही मागे टाकले आहे. रुईयाची सायन्सची कटऑफ 91 टक्क्यांवर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉमर्समध्ये एनएम कॉलेजच टॉप ठरले असून या कॉलेजची कॉमर्सची कटऑफ 93.6 टक्के आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मात्र कटऑफ खाली आला आहे. या कॉलेजचा गेल्या वर्षीचा कटऑफ 94.2 टक्के होता.

आर्टस्मध्ये सर्वाधिक कटऑफ हा सेंट झेवियर्स कॉलेजचा आहे. झेवियर्सचा कटऑफ यंदा 94 टक्के आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा कटऑफ 0.2 टक्क्यांनी खाली आला आहे. झेवियर्सपाठोपाठ रुईयाचा आर्टस्चा कटऑफ 92.6 टक्के आहे.

पहिल्या यादीत एसएससीचे 1 लाख 22 हजार विद्यार्थी

पहिल्या यादीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या एसएससीच्या बोर्डाच्या 1,68,991 विद्यार्थ्यांपैकी 1,21,553 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सीबीएसईच्या 4679, आयसीएसईचे 6318, आयबी बोर्डाचे 4, आयजीसीएसईचे 538, एनआयओएस 437 आणि इतर 938 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे.

 • एकूण अर्जदार विद्यार्थी-1,85,318
 • प्रवेश मिळाले-1,34,467

शाखानिहाय प्रवेश

 • आर्टस् -14,131
 • कॉमर्स -80,402
 • सायन्स–38,714
 • एचएसव्हीसी -1,220

एकूण 48,872 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या यादीसाठी या विद्यार्थ्यांचा विचार होणार नाही.

 • 13, 15 आणि 16 जुलैदरम्यान प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली आहे.
 • पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आर्टस् शाखेचे 7,337, कॉमर्सचे 23 हजार 349, सायन्सचे 17 हजार 52 तर एचएसव्हीसीचे 1134 विद्यार्थी आहेत.
 • दोन ते दहा क्रमांकाचे कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकतात किंवा दुसऱ्या यादीसाठी पुन्हा अर्ज भरू शकतात.
 • 17 आणि 18 जुलैला दुसऱ्या यादीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. गरज असल्यास विद्यार्थी कॉलेज पसंतीक्रमात बदल करू शकतात.
 • दुसरी गुणवत्ता यादी 22 जुलैला सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे.

‘एसईबीसी’ आरक्षणाचे दुप्पट अर्ज

सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) 12 टक्के राखीव कोटय़ातून ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. आधी दिलेल्या मुदतीत या कोटय़ातून मुंबई विभागातील 2548 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या कोटय़ाच्या तब्बल 15 हजार 531 जागा मुंबई विभागात आहे. आता अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर आणखी 2178 विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीसाठी अर्ज केले. अर्ज करण्याच्या मुदतवाढीनंतर आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून (ईडब्लूएस) आणखी केवळ 296 अर्जच प्राप्त झाले.

आपली प्रतिक्रिया द्या