
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी महागली आहे. व्यवस्थापन कोट्याअंतर्गत सुधारित सफारी शुल्क १ ऑ क्टोबरपासून लागू केले जाणार आहे. त्यामुळे ताडोबाची सफारी आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पर्यटकांना खुणावत असतो. देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटकदेखील या व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. कोअर क्षेत्रच नाही, तर बफर क्षेत्रातही अलीकडे सहज व्याघ्रदर्शन होत आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटनाची दारे खुली होत आहेत. मात्र, त्याचवेळी पर्यटकांना नव्या सफारी शुल्कासह या व्याघ्र प्रकल्पात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
नवे शुल्क याप्रमाणे –
- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क ४ हजार ६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क सातशे रुपये व वाहन शुल्क ३३०० रुपये असे एकूण ८६०० रुपये शुल्क.
- शनिवार आणि रविवारी कोअर क्षेत्रात प्रवेश शुल्क ८६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये, वाहन शुल्क ३३०० रुपये असे एकूण १२ हजार ६०० रुपये करण्यात आले आहे.
- बफर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क ३६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क ३ हजार रुपये असे एकूण ७३०० रुपये आकारले जाणार आहे.
- शनिवार व रविवारी प्रवेश शुल्क ६६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क ३ हजार रुपये असे एकूण १०,३०० रुपये आकारले जाणार आहे.