आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 16 जणांचा मृत्यू; एथिलीन ग्लायकॉलच्या अंशामुळे किडनी निकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दुध प्यायल्याने मोठी जीवितहानी झाली असून, मृतांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात लालचेरुवू परिसरातून पुरवण्यात आलेले भेसळयुक्त दूध प्यायल्याने अनेक नागरिकांना गंभीर आजार जडले होते. सध्या राजामहेंद्रवरम येथील रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेतील पीडितांना सुरुवातीला उलट्या होणे, पोटदुखी आणि लघवी न होणे यांसारखी लक्षणे जाणवली होती. त्यानंतर अचानक किडनी निकामी झाल्यामुळे अनेकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. 22 फेब्रुवारी रोजी चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगर भागातून अशी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात समोर आल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले. आरोग्य विभागाने केलेल्या प्रयोगशाळा तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दुधामध्ये ‘एथिलीन ग्लायकॉल’ नावाचा अत्यंत विषारी पदार्थ मिसळला गेल्याने पीडितांच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला आणि अनेक अवयव निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तपासानुसार, कोरुकोंडा मंडलातील नरसपुरम गावातील एका डेअरी युनिटमधून 100 हून अधिक कुटुंबांना या दुधाचा पुरवठा केला जात होता. हे युनिट भेसळीचे मुख्य केंद्र असल्याचे स्पष्ट होताच प्रशासनाने दुधाचा पुरवठा तात्काळ बंद केला आहे. 16 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत एकूण 20 जणांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला, तर एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्यांमध्ये वृद्ध आणि मुलांचा समावेश असून, अनेकांना डायलिसिस आणि व्हेंटिलेटरची मदत घ्यावी लागत आहे.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाधित क्षेत्रांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली आहेत. तसेच, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले असून हैदराबादहून वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपचारांवर देखरेख ठेवत आहेत. एका मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित दूध विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. फॉरेन्सिक आणि पशुसंवर्धन विभागाच्या पथकांनी दुधाचे नमुने, जनावरांचे खाद्य आणि पाण्याचे नमुने संकलित करून सखोल तपासाला सुरुवात केली आहे.