मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या अॅड. सदावर्ते यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी हायकोर्टात पक्षकाराच्या वतीने याचिका दाखल करणारे वकील गुणरतन सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाबाहेर मारहाण करण्यात आली. वैजनाथ पाटील असे त्या हल्ला करणाऱया तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात आज कोर्टात काय झाले त्याबाबत अॅड. गुणरतन सदावर्ते पत्रकारांना माहिती देत होते. तेवढय़ात ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत वैजनाथ पाटील यांनी पत्रकारांच्या गराड्यात शिरून गुणरतन सदावर्ते यांना मारहाण केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर सदावर्ते यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर धाव घेत पोलिसांसमोरच आपल्यावर हल्ला झाल्याचे खंडपीठाला सांगितले व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. न्यायमूर्तींनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केले व याचिकाकर्त्या जयश्री पाटील आणि अॅड. सदावर्ते यांना पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले.

उदयनराजेंचीही धमकी
दररोज अज्ञातांकडून धमक्यांचे फोन व मेसेज येत असल्याचे अॅड. सदावर्ते यांनी कोर्टाला सांगितले. आतापर्यंत आपल्याला धमक्यांचे हजारहून अधिक फोन आले असून त्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांचाही समावेष असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

वकिलांनीही कायदा हातात घेतला
अॅड. सदावर्ते यांच्यावर धावून गेल्यानंतर वैजनाथ पाटील यांना सदावर्ते यांच्या समवेत असलेल्या दोघा वकिलांनीच जोरदार मारहाण केली. तेथे पोलीस उपस्थित असतानाही हे वकील पाटील यांना मारझोड करत होते. त्यामुळे वकिलांनीच कायदा हातात घेल्याची चर्चा हायकोर्टात दिवसभर सुरू होती.