
एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 किमीपेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱया प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. 1 जुलैपासून प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्य योजनाअंतर्गत सवलतधारक प्रवाशांना ही सूट लागू नसेल.
एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनी सरकारने या योजनेबाबत घोषणा केली होती. त्यानुसार येत्या मंगळवारपासून सर्व प्रकारच्या बससाठी ही योजना लागू केली जाणार आहे. पूर्ण तिकीट काढणाऱया प्रवाशांनाच या योजनेचा लाभ घेता येईल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. आषाढी एकादशी व गणेशोत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱया प्रवाशांना योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱया नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना तिकीट दरात 15 टक्के सवलत लागू होणार आहे. प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर
वा msrtc Bus Reservation या मोबाईल ऍपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15 टक्के सवलत प्राप्त करता येऊ शकते, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.