विष्णुप्रिया

870

>> डॉ. दीपक केसरकर, आयुर्वेदतज्ञ

आज आषाढी एकादशी. हिरव्याकंच तुळशीचे महत्त्व आपल्या संस्कृतीत अबाधित… खर्‍या अर्थाने ती विष्णुप्रिया. लोककल्याणाचा औषधी वसा तिनेही घेतलाय. सर्दी-पडसे, ताप, अंगदुखी व इतर अनेक विकारांवर तुळस गुणकारी ठरते.

महाविष्णूची तुला ज्या पत्रीने पार पडली त्या पत्रीला तुळशी म्हणतात. वृदा मंजिरी विष्णू वल्लभा, हरीप्रिया, गौरी, विष्णुपत्नी अशा अनेक नावांनी या वनस्पतीचे वर्णन ग्रंथात सापडते. कृष्ण तुळस आणि श्वेत तुळस असे दोन प्रकार पाहण्यात येतात. ग्रंथात २६ प्रकारच्या तुळशीचे वर्णन सापडते.

‘ज्याच्या घरी नाही तुळशी वृंदावन, जाणावे स्मशान तेथेचि हो’ असा अभंग संत साहित्यामध्ये आलेला आहे. अशी २४ तासांमधील जास्तीत जास्त काळ प्राणवायू देणारी एकमेव वनस्पती आहे. दुर्गंधीनाशक या गुणामध्ये तुळशीची पाने चावून खाल्ल्यास कीडलेल्या दातांतील कीड मरते व तोंडाला येणारा घाण वास येत नाही. त्याचप्रमाणे यकृतावर चांगले कार्य करून शौचाला येणारा घाण वास दूर होतो. अशी ही बहुगुणी तुळस प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरी जाताना देते आणि आवर्जून सांगते कीं, तू या तुळशीची सेवा कर. ही तुला आईसारखी प्रेम आणि सुख देईल. अशी सासर आणि माहेर यांना जोडणारी प्रत्येक स्त्रीची सखी तुळस असते.

पानांचाही लाभ

 • रोज सकाळी तुळशीची दोन पाने धऊन चावून चावून खावी असं म्हटलं जातं. यामुळे पूर्ण दिवस उत्साही जातो. कारण तुळस ही शरीरातील रक्ताभिसरण उत्तम करते.
 • तुळशीच्या पानांचा रस भूक वाढवणे, पचन सुधारणे, त्यासोबत पोटदुखी व जंतावर खूप फायदेशीर ठरते.
 • हृदयाला बळ देणारी, रक्तशुद्धी करणारी आणि हृदय व किडनी यांच्या बिघाडामुळे आलेल्या सुजेवर चांगले काम करते.
 • ज्यांना पोट साफ न होण्याची वारंवार तक्रार असते त्यांनी पाण्यात तुळशीची पाने भिजत ठेवायची. बुळबुळीत
 • झाल्यावर ती खावीत. यामुळे शौचाला येणारा कडकपणा दूर होतो व जोर न देता पोट मनासारखे समाधानपूर्वक साफ होते. तुळशीचे बी लघवी  साफ करते. लघवीतील जळजळ, लघवीतील जंतुसंसर्ग बरा करते.
 • सर्दी-खोकला आणि त्यामुळे पाठदुखीसोबत ताप असेल तर तुळशीच्या पानांचा रस मधासोबत द्यावा. त्याने कफ कमी होऊन ही लक्षणे बरी होतात.
 • तुळस किंवा तुळशीचा कल्प घेतल्यास शरीराला घाम येतो. त्यामुळे त्वचा विकारामध्ये त्याचे सुंदर रिझल्ट बघायला मिळतात.
 • तुळशीची पाने आणि मीर पावडर एकत्र वाटून लावली तर कीड मरते आणि गजकर्ण लवकर बरे होते. 

असा घ्या काढा

 • कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण१० मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
 • तुळशीचं दूध तापार नियंत्रण मिळण्यास मदत करते. अर्धा लीटर पाण्यामध्ये वेलचीची पाडर आणि तुळशीची पानं मिसळा. यामध्ये थोडं दूध आणि साखर मिसळा. हे दूध गरम प्यावे. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.
 • ताप कमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीही हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. १०-१५  तुळशीची पाने पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावी. २- तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.
आपली प्रतिक्रिया द्या