लढाऊ अफगाणिस्तानचा नामिबियावर धडाकेबाज विजय; टीम इंडियाचे टेन्शन आणखी वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीत पाकिस्तानला अखेरच्या षटकापर्यंत झुंजवणाऱया लढाऊ अफगाणिस्तानने नामिबियावर 62 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने नामिबियासमोर 161 धावांचे  आव्हान ठेवले  होते, पण नामिबियाचा संघ 9 बाद 98 धावाच करू शकला. या विजयामुळे हिंदुस्थान आणि न्यूझीलंडच्या चिंतेत भर पडली आहे.

अफगाणिस्तानची धावगती पाहता हिंदुस्थान आणि न्यूझीलंडला अफगाणिस्तानला पराभूत करणे गरजेचे आहे. अन्यथा धावगतीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याचा आशा बळावतील. अफगाणिस्तानचे 4 गुणांसह +3.097 इतकी धावगती झाली आहे. टीम इंडियाची  धावगती -0.973, तर न्यूझीलंडची धावगती -0.532 इतकी आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 160 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानाचा सलामीवीर मोहमद शेहजाद याने 33 चेंडूंमध्ये 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये त्याने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 45 धावा ठोकल्या. सलामीवीर हजरतुल्ला जझई याने 27 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 33 धावा केल्या. तसेच असगर अफगान याने 23 चेंडूंत केलेल्या 31 धावा, तसेच कर्णधार मोहमद नाबीच्या 17 चेंडूंतील 32 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने पाच विकेटच्या  मोबदल्यात 160 धावा केल्या. नामिबियाकडून रुबेन ट्रम्पेलमन याने दोन गडी, निकोल ईटॉन याने दोन, तर जे. स्मिथ याने 1 गडी बाद केला.

160 धावांच्या आव्हानाचा  पाठलाग करताना नवख्या नामिबियाची  सुरुवात निराशाजनक झाली. डेव्हिड विझ वगळता कोणत्याही फलंदाजाला अफगाणिस्तानच्या भेदक माऱयापुढे तग धरता आला नाही. अफगाणिस्तानच्या प्रभावी गोलंदाजीमुळे नामिबियाचा डाव 20 षटकांत 9 बाद 98 या धावसंख्येवरच कोलमडला.