Crime News – कुलाबा, धारावीत वास्तव्य करणारे अफगाणी नागरिक गजाआड

बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिपृतपणे धारावी आणि कुलाबा येथे राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या सहा नागरिकांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मोहम्मद जाफर नबीउल्लाह खान, असद समसुद्दीन खान, मोहम्मद रसूल खान, अख्तर जमालुद्दीन, झिआउल हक्क खान, अब्दुल खान अशी त्यांची नावे आहेत. त्या सर्वाना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

कुलाबा आणि धारावी परिसरात काही अफगाणी नागरिक राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 1 आणि युनिट 5 च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या माहितीची शहनिशा पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिसांनी पुलाबा आणि धारावी येथून सहा जणांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यानी ते हिंदुस्थानी नागरिक असल्याचे सांगितले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी अफगाणी नागरिक असल्याची कबुली पोलिसाना दिली. अटक अफगाणी नागरिक हे गेल्या दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने वैद्यकीय व्हिसावर दिल्लीत आले. दिल्लीत काही महिने वास्तव्य केल्यानंतर ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर ते कुलाबा आणि धारावी येथे राहत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.


 

तरुणीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल 

तरुणीशी लगट करून एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पीडित तरुणी ही गोरेगाव परिसरात राहते. शनिवारी रात्री ती सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दिशेने जात होती. तेव्हा तिला कोणीतरी दगड मारला. तिने मागे वळून पाहिले असता तेथे यासीन हा उभा होता. तेव्हा तरुणीने त्याच्याकडे रागाने पाहिल्यावर त्याने मोबाईलची स्क्रीन तिच्या दिशेने नेली. त्याच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ सुरू होते. त्याने अश्लील व्हिडिओ तिला दाखवून तिच्याशी लगट केल्याचा आरोप आहे.  तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.