
सामना प्रतिनिधी । मुंबई
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनंतर मराठी सिनेमात काम करणार आहेत. मिलिंद लेले दिग्दर्शित आगामी ‘ए बी आणि सी डी’ या मराठी सिनेमात बिग बी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस सिनेमाचे चित्रीकरण होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या मित्राची भूमिका महानायक अमिताभ बच्चन साकारणार आहेत. या सिनेमाची कथा हेमंत एदलाबादकर यांनी लिहिली आहे. यापूर्वी 1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘आक्का’ या मराठी सिनेमातील ‘तू जगती गणपती’ या गाण्यात बिग बी आणि जया बच्चन यांची झलक पाहायला मिळाली होती. बिग बी मराठी सिनेमात काम करणार असल्याने आतापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





























































