कवठे येमाईमध्ये दोन वर्षांच्या खंडानंतर श्री येमाई देवीची निघाली पालखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामदैवत,कुलदेवी व संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान,आराध्य दैवत,कुलदैवत असणाऱ्या श्री येमाई देवीची दरवर्षी आषाढ – श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी सायंकाळी गावातून सवाद्य निघणारी पालखी मिरवणूक कोरोना काळात दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाची स्थिती निवळली असल्याने सर्वत्र मंदिरे खुली झाली आहेत. या दोन अडीच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मंगळवारी प्रथमच श्री येमाई देवीची पालखीची सायंकाळी कवठे गावठाणातून मिरवणूक काढण्यात आली.

आषाढ महिन्यातील पहिल्या मंगळवारचा देवीची पालखी काढण्याचा परंपरागत मान येथील जैन बांधवाना असून गावापासून 3 किमी अंतरावर असणाऱ्या श्री येमाई देवी मंदिरात जाऊन देवीची जैन बांधवाकडून विधिवत अभिषेक, पूजा करण्यात आली. पालखी मिरवणूकीदरम्यान सुवासिनींनी पालखीत स्थानापन्न असलेल्या देवीच्या प्रतिमेचे ओवाळून, औक्षण करून पूजन केले. ग्रामपंचायत पारापासून निघणाऱ्या देवीच्या पालखीचे भाविक भक्तांनी दर्शन घेतले. गावातून पालखी मिरवणूक प्रदक्षिणा झाल्यानंतर पुन्हा पारावार येऊन देवीची आरती करून उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले.