
एअर इंडियाच्या (12 जून) एआय 171 विमानाला अहमदाबादमध्ये अपघात झाला. लंडनला जाणाऱ्या विमानात 241 जणांचा यात मृत्यू झाला. आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर 38 तासांनी, आणखी एक मोठा अपघात थोडक्यात टळला होता. दिल्लीहून व्हिएन्नाला जाणाऱ्या बोईंग 777 विमानाला टेकऑफ घेतल्यानंतर लगेचच अनेक गंभीर इशारे मिळाले होते.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 14 जूनला पहाटे 2.56 वाजता घडली होती. विमानाला ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम (GPWS) कडून दोन इशारे मिळाले होते. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमान टेकऑफनंतर लगेचच सुमारे 900 फूट खाली आले होते. विमान 9 तास 8 मिनिटांनी व्हिएन्नामध्ये सुरक्षितपणे उतरले असले तरी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अपघातानंतर चौकशी सुरू केली होती.
चौकशीनंतर दोन्ही वैमानिकांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. एअरलाइनच्या सुरक्षा प्रमुखांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, क्रूला स्टिक शेकर अलर्ट मिळाला होता. हा एक गंभीर इशारा समजला जातो. ही प्रणाली वैमानिकांचे लक्ष ताबडतोब वेधण्यासाठी आणि सुधारात्मक कारवाईची मागणी करण्यासाठी डिझाइन केली आहे.
घटनेशी परिचित अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानात उड्डाणादरम्यान स्टिक शेकर आणि GPWS अलर्टमध्ये समस्या होती. टेकऑफनंतर लगेचच स्टिक शेकर वॉर्निंग आणि GPWS सिंक वॉर्निंग दिसली. स्टॉल वॉर्निंग एकदा आली आणि GPWS सावधानता दोनदा आली. टेकआॅफ दरम्यान सुमारे 900 फूट विमान खाली होते.
AI 171 अपघातानंतर फक्त 38 तासांनी ही घटना घडली. AI 171 अपघातानंतर, DGCA ने एअरलाइनच्या ताफ्याचे आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे निरीक्षण सुरू केले होते. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पायलटचा अहवाल मिळाल्यानंतर, नियमांनुसार हे प्रकरण डीजीसीएला कळवण्यात आले. त्यानंतर, विमान रेकॉर्डरमधून डेटा मिळाल्यानंतर पुढील चौकशी सुरू करण्यात आली होती.