आधीच ‘उल्हास’… त्यात ‘कोरोना’मास, आठवीत जाईपर्यंत विद्यार्थी संख्येला घरघर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव होण्याच्या आधीपासूनच राज्यात पाचवीतून आठवीत जाईपर्यंत विद्यार्थीसंख्येला घरघर लागल्याचे समोर आले आहे. आता लॉकडाऊनंतर तब्बल नऊ महिन्यांनी 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहे. त्यामुळे शाळांचे सँनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना चाचणीबरोबच आधीच ’उल्हास’… त्यात आता ’कोरोना’मासामुळे पटसंख्या राखण्यासाठी विद्यार्थ्यांना शोधून शाळेत आणण्याचे काम शाळांना करावे लागणार आहे.

कोरोनाच्या आधीच्या शैक्षणिक वर्षात (2019-20) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि माध्यमाच्या शाळेतील पाचवी ते आठवीची संख्या कमी झालेली आहे. शिक्षण विभागाच्या यु-डायसप्रणालीनुसार गेल्या शैक्षणिक वर्षात पाचवीत 19 लाख 98 हजार 966 विद्यार्थी शिकत होते. पुढे सहावीत 19 लाख 74 हजार 24 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. सातवी आणि आठवीत ही संख्या आणखी कमी होऊन अनुक्रमे 19 लाख 50 हजार 828 आणि 19 लाख 23 हजार 182 एवढी झाली. यंदा कोरोनामुळे शाळाच भरलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर डिजीटल शिक्षणाच्या पर्यांयाची उपलब्धता नसल्यामुळे शाळेशी नाळ तुटलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची भिती आहे.

विद्यार्थी गळतीची कारणे

बालविवाह, मजुरांचे स्थलांतर, गरीबी, लेखन-वाचन कौशल्याचा अभाव, बालमजुरी, हायस्कूलचा अभ्यास झेपत नाही, शाळा घरापासून लांब.

विद्यार्थीगळती झालेले जिल्हे

अकोला, संभाजीनगर, बीड, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जळगाव, जालना, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार,  पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वाशिम.

नवीन संसार सुरू करण्याचा प्रयत्न

कोरोनानंतर सुरू होणारी शाळा म्हणजे नवीन संसार सुरू करण्याचा प्रकार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी सांगितले. पाचवी ते आठवीची विद्यार्थीसंख्या राखण्याचे काम शाळांना करावे लागणार असून याचा परिणाम शाळेच्या संचमान्यतेवर होऊ शकतो. त्यामुळे सरकारने यंदाच्या वर्षाच्या संचमान्यतेत शाळांना शिथिलता द्यावी, अशी मागणीही विजय नवल पाटील यांनी केली.

मुलींबरोबच मुलांच्या गळतीचे प्रमाणही अधिक

मुलींबरोबरच मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाणही अधिक आहे. यात शेतकाम आणि मजुरीची कामे करणार्या मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे, असे शिक्षणतज्ञ हेरंब पुलकर्णी यांनी सांगितले. राज्यात आजही बालविवाहाचे प्रमाण 26.3 टक्के असून सर्वाधिक 30 टक्के बालविवाह मराठवाडय़ात नोंदविले गेल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच शहरी भागात कामानिमित्त येणारे अनेक कामगार नोकरीची ठिकाणे बदलत असल्याने त्याचा परिणामही मुलांच्या शिक्षणावर होतो.

इयत्तानिहाय विद्यार्थीगळती

जिल्हा                 पाचवी          आठवी

पुणे                    1,86,996      1,70,822

ठाणे                  1,57,979       1,45,298

मुंबई उपनगर         38,609          29,328

पालघर                79,235                 0,491

संभाजीनगर           87,869        79,633

नाशिक               1,22,743      1,15,910

नंदुरबार             34,162                   9,950