श्रीनगरातील पोलीस ठाण्यात भयंकर स्फोट; दहशतवाद्यांकडून पकडलेल्या स्फोटकांचा साठा उडाला, टेरर मॉडय़ुलचे पुरावे नष्ट झाल्याची भीती

दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असतानाच श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भयंकर स्फोट झाला. फरिदाबाद येथे दहशतवाद्यांकडून पकडलेल्या स्फोटकांचे नमुने घेताना हा स्फोटकांचा साठाच उडाला. यात कर्तव्यावरील पोलिसांसह नऊ जणांच्या देहाच्या चिंधडय़ा उडाल्या, तर 32 जण जखमी झाले. या स्फोटाबरोबर ‘व्हाईट कॉलर टेरर मॉडय़ुल’चे पुरावेही नष्ट झाल्याची भीती आहे. हा अपघात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, मात्र यामागे घातपाताचा संशयदेखील व्यक्त होत आहे. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्फोटाच्या कारणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आधी तपास यंत्रणांनी यूपी, हरयाणा व जम्मू-कश्मीरमध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी छापे टाकले होते. फरिदाबादमधील छाप्यात स्फोटकांचा 360 किलोंचा साठा जप्त करण्यात आला होता. हा साठा नंतर कश्मीरमध्ये आणला गेला. यात अमोनियम नायट्रेट, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट यासह विविध प्रकारची रसायने होती. दोन दिवसांपासून फॉरेन्सिकची टीम या स्फोटकांचे नमुने गोळा करत होती. हे करत असतानाच शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा स्फोट झाला.

जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक नलीन प्रभात यांनी याबाबत माहिती दिली. ‘या स्फोटाशी दहशतवादी हल्ल्याचा संबंध नाही. हा दुर्दैवी अपघात होता, असा दावा त्यांनी केला. मृतांमध्ये फॉरेन्सिक टीमचे तीन कर्मचारी, दोन फोटोग्राफर, दोन महसूल अधिकारी व अन्य दोघांचा समावेश आहे. तर, 27 पोलीस, दोन अधिकारी व तीन नागरिक जखमी झाले, तर पोलीस ठाण्यासह आसपासच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले.

स्फोटके फरिदाबादहून कश्मीरला का आणली?

‘व्हाईट कॉलर टेरर मॉडय़ुल’ प्रकरणात मूळ गुन्हा श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानुसार ही स्फोटके नौगाम पोलीस ठाण्याच्या ताब्यात असणे गरजेचे होते. त्यासाठीच ती फरिदाबादहून येथे आणण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. व्हाईट कॉलर टेरर मॉडय़ुलची संभाव्य टार्गेट कोणती होती, याबाबत अद्यापही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. सध्या जी काही माहिती समोर आली आहे, ते केवळ तर्कवितर्क आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.