
>> अमित घोडेकर
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आपण इतके आहारी गेलो आहोत की कोणत्याही घटनेचा व्हिडीओ घेणं हे एवढंच आपल्या हाती राहिलं आहे…
गेल्या आठवडय़ात एक व्हिडीओ खूप मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला होता. एक मुलगा आणि त्याचे मित्र एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करत असतात आणि तो मुलगा गाडीच्या दरवाजात उभा राहून एक पाय खाली ठेवून पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस त्याचा दुसरा मित्र खिडकीतून त्याचा टिकटॉकवरून व्हिडीओ बनवत असतो. एकदोनदा वरखाली व्यवस्थित केल्यावर तिसऱया वेळेस नेमका त्या मुलाचा तोल जातो, त्याचे हात सटकतात आणि तो पडतो. क्षणभर कोणालाच तो दिसत नाही आणि सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडतो, पण टिकटॉक व्हिडीओ काढणारा मात्र त्याचं काम करत राहतो. सगळे त्या मुलाला शोधतात. काही सेकंदांत तो मुलगा रुळाच्या आणि गाडीच्या सपाटीत पडलेला दिसतो. सगळे त्याला तिथेच पडून राहायला सांगतात. सगळ्यांना त्याची काळजी. मात्र टिकटॉकवरून व्हिडीओ घेणारा हे सगळं टिपत असतो. हा व्हिडीओ बघितल्यावर प्रश्न पडला की, आपण टिकटॉकवर व्हिडीओ घेताना किती निर्जीव झालो आहोत आणि टिकटॉक व्हिडीओचे हे पेव किती धोकादायक आहे.
असंच काहीसं तुमकूरमधील एका कॉलेजमधील मुलाने टिकटॉकवर त्याच्या मित्रासोबत त्याच्या हातात दुरून पळत येऊन उलटी उडी मारायचा व्हिडीओ घेतला. हा व्हिडीओ घेत असताना तो मुलगा त्याच्या मानेवर पडला आणि त्याच्या मज्जासंस्थेला जबर मार लागला. त्यात त्याला अर्धांगवायूचा झटका आला. सध्या अशीच एक मोठय़ा प्रमाणात टिकटॉकवर व्हायरल झालेली गोष्ट म्हणजे ‘स्कलब्रेकर चॅलेंज’. अमेरिकेतील किशोरवयीन मुलांची ही स्कलब्रेकर चॅलेंज सध्या सगळीकडे खूप धुमाकूळ घालत आहे. यात तीन मुलांनी शेजारी शेजारी उभे राहायचे आणि मधल्या मुलाने एक उंच उडी मारायची. मग त्याच्या बाजूला उभ्या असणाऱया दोन मुलांनी त्यांच्या पायाने या उंच उडी मारणाऱया मुलाला खाली पाडायचे. मग तो मुलगा खाली डोक्यावर पडला की, त्याचे स्कल अर्थात डोक्याकडचा भाग किती दणकट आहे याचे चित्रीकरण करायचे आणि तो व्हिडीओ टिकटॉकवर टाकायचे. यात अनेक मुलांचा जीव गेला आणि अनेक मुलांना अतिशय गंभीर अपघात झाले. जगभरात अनेक ठिकाणी याविरुद्ध जनभावना निर्माण झाल्यावर मग टिकटॉकने ‘स्कलब्रेकर चॅलेंज’वर बंदी घातली.
मध्यंतरी आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटातील नायिका हीदेखील एक टिकटॉक स्टार असते आणि ती दररोज अनेक गाण्यांवर वेगवेगळे व्हिडीओ बनवत असते. आजकाल फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामनंतर सगळ्यात जास्त वापर टिकटॉकचा होत आहे. टिकटॉकवर व्हिडीओ बनवून तो अपलोड करणे म्हणजे एक प्रकारची फॅशन झाली आहे. टिकटॉकवर अक्षरशः लाखो गाणी आणि वेगवेगळ्या प्रकारे मिक्सिंग करता येणाऱया अनेक गोष्टी असल्यामुळे टिकटॉक हे लहान शाळकरी विद्यार्थी असोत की इतर कोणी, सगळे सहजपणे हाताळू शकतात. त्यामुळे टिकटॉक प्रचंड लोकप्रिय झाले आहे, पण एकंदरीत टिकटॉकवर जे धोकादायक व्हिडीओचे पेव आणि ‘स्कलब्रेकर चॅलेंज’सारखे अनेक लोकांचे जीव गेल्यावर बघितलं की, वाटतं, टिकटॉकशिवाय आयुष्यात बऱयाच गोष्टी करता येऊ शकतात.
(लेखक मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.)


























































