निवडणूक जिंकताच इम्रान खानने आळवला कश्मीर राग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खानचा पक्ष तहरीक-ए-इंसाफ याला सर्वाधिक जागा मिळाल्या. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात या पक्षाचा प्रमुख इम्रान खान याने कश्मीर राग आळवला आहे. कश्मीरमध्ये गेल्या ३० वर्षांपासून मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप इम्रान खानने केला आहे. कश्मीर प्रश्न हा फक्त चर्चेने सुटू शकतो असेही तो यावेळी म्हणाला. जर एकमेकांवर फक्त आरोप प्रत्यारोप करत बसलो तर हा मुद्दा जसाचा तसा राहील, असेही तो म्हणाला.

आपल्या पहिल्या भाषणादरम्यान इम्रान खानने हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांवर गंभीर आरोप केला. हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांनी मला एखाद्या बॉलिवूडच्या व्हिलनप्रमाणे दाखवले, याबद्दल मला वाईट वाटतेय असे तो म्हणाला. तसेच हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध चांगले झाले तर याचा आम्हाला फायदाच होईल असेही तो म्हणाला. दोन्ही देशांमध्ये व्यापार वृद्धी व्हायला हवी असे मतही त्याने व्यक्त केले. हिंदुस्थानने एक पाऊल उचलले तर आम्ही दोन पावले पुढे येऊ. आशियामध्ये शांतता टीकून राहण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध आवश्यक आहे आणि प्रत्येक वादावर चर्चा व्हायला हवी, असेही इम्रान आपल्या भाषणात म्हणाला.