टीका झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला जाग, राज्यातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तब्बल पाच वर्षांनी फडकला तिरंगा ध्वज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्यातील सर्वांत उंच दावा असणाऱया 303 फुटांच्या ध्वजस्तंभावर अखेर शनिवारी राष्ट्रध्वज फडकला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी हा राष्ट्रध्वज फडकणार का, अशी सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाला जाग येऊन हा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर पोलीस मुख्यालयासमोर हा भव्य ध्वजस्तंभ एका खासगी कंपनीच्या देखरेखीखाली उभा करण्यात आला. देशातील दुसऱया क्रमांकाचा हा 303 फुटांचा भव्य राष्ट्रध्वज असल्याचा दावा त्यावेळी संबंधितांकडून करण्यात येत होता. 1 मे 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठय़ा दिमाखात गाजावाजा करून हा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. नेहमी 24 तास हा राष्ट्रध्वज फडकत राहील, असा त्यावेळी दावाही संबंधितांकडून करण्यात आला होता. मात्र, अवघ्या दोन-तीन महिन्यांनंतर विविध कारणे सांगून हा राष्ट्रध्वज फडकविणे बंद करण्यात आले होते. समाजमाध्यमातून ही टीका होऊ लागली तरी गेल्या चार-पाच वर्षांपासून राष्ट्रध्वजाविना हा ध्वज स्तंभ तसाच उभा होता.

दरम्यान, सध्या सर्वत्र देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. सर्वत्र ‘हर घर तिरंगा’ मोहीम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे यानिमित्ताने तरी या सर्वांत उंच ध्वज स्तंभावर राष्ट्रध्वज फडकणार का, अशी सर्वच स्तरातून टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत हा राष्ट्रध्वज फडकविण्याचे इंद्रधनुष्य पेलले.

आज सकाळी पोलीस उद्यानात विशेष निमंत्रित ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मीनाताई गुरव, वसंतराव माने तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी पोलीस विभागाकडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी प्रशासकीय अधिकाऱयांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.