आता पुढली विकेट मिंधे गटातील मंत्र्याची? रोहित पवार यांची पोस्ट व्हायरल

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी अकहर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील विकेट ही मिंधे गटातील मंत्र्यांची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे.”

रोहित पवार म्हणाले की, “वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे, हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे.” ते म्हणाले, “या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा. आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत.”