
हिंदुस्थानी महिला क्रिकेट विश्वात सलग दोन खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी मिताली राज या स्टार क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता आणखी एका क्रिकेटपटूने निवृत्ती स्वीकारत असल्याचं जाहीर केलं आहे.
या खेळाडूचं नाव रुमेली धर असं आहे. रुमेली हिने 38व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ती हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार राहिली आहे. तिने बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं.

रुमेली ही क्रिकेट संघातील डावखुरी फलंदाज आणि वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. ती म्हणाली की, पश्चिम बंगालच्या श्यामनगर येथून सुरू झालेला माझ्या क्रिकेटचा 23 वर्षांचा प्रवास आता संपला आहे. मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती स्वीकारत आहे. हा प्रवास खूप मोठा होता. त्यात खूप चढउतार होते, असंही ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत रुमेलीने 78 महिला एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 961 धावा केल्या आहेत. तसेच 63 बळीही घेतले आहे. तिने 2003मध्ये इंग्लंड विरुद्ध पदार्पण करताना सहा अर्धशतकं झळकावली होती. तिने तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना 2012मध्ये खेळला होता.



























































