
पुण्यातील जमीन घोटाळय़ात पार्थ पवार यांचे नाव आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वर्षा’ बंगला गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी पार्थला वाचवा नाहीतर राजीनामा देऊन सरकारबाहेर पडेन, असा इशारा दिला. त्यामुळेच पार्थ यांना भाजपाकडून वाचवले जात आहे, असे आज शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
आधी अडचणीत आणायचे आणि नंतर आपणच बाहेर काढायचे असे काम सध्या भाजपकडून होतेय, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो, अशी भूमिका रागाने, त्वेषाने घेतल्याचे आपल्या कानावर आहे आणि हे दाव्याने बोलतोय, असे दानवे म्हणाले. हे सर्व होणार याची कल्पना भारतीय जनता पार्टलाही होती, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ज्याने लोकसभा लढवली ते पार्थ पवार काय लहान बाळ आहेत का, कुणाचा मुलगा म्हणून त्याला वागणूक न देता देशाचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून वागणूक दिली पाहिजे, असेही दानवे म्हणाले.
व्यवहार रद्द केला तर स्टॅम्प डय़ुटी सरकारला भरावी लागेल
ते म्हणाले की, पार्थ पवार हे पुण्यातील जमीन व्यवहार करणाऱया अमेडिया कंपनीचे संचालक असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? फक्त मुद्रांक शुल्क चुकवले गेले म्हणून का कारवाई होते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचे असा दावा भाजपाकडून केला जात आहे. पण मुद्रांक शुल्क भरले जात नाही तोपर्यंत व्यवहार रद्द करता येत नाही आणि एखादा व्यवहार रद्द केला गेला तर तेवढेच मुद्रांक शुल्क सरकारला भरावे लागते असा नियम आहे, असेही अंबादास दानवे यांनी निदर्शनास आणले आहे.
पार्थ यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे
इतका मोठा बोगस व्यवहार करण्याची तहसीलदाराची क्षमता नसून पार्थ यांना वाचवण्यासाठी तहसीलदाराचा बळी देणे चूक आहे, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशिवाय पार्थ पवार वाचणे अशक्य आहे, असे सांगतानाच पार्थ यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.





























































